नेवासा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; आमदार लंघे यांची मागणी

नेवासे : नेवासे तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसारख्या परिस्थितीमुळे शेतकरी, नागरिक आणि व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर मात करण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने पंचनामे करून शासनस्तरावर मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले.
सप्टेंबर महिन्यात तालुक्यातील ५० टक्क्यांहून अधिक शेती पावसाच्या पाण्याने उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली, तर अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली. कौटुंबिक आणि व्यावसायिक साहित्याचेही मोठे नुकसान झाले. गावोगावच्या छोट्या व्यापाऱ्यांची उपजीविकेची साधनेही पाण्यात वाहून गेली, त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार लंघे यांनी उपमुख्यमंत्र्यांना तालुक्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शासन सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे सांगत, पंचनाम्यांची प्रक्रिया गतिमान करून लवकरात लवकर ठोस मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले.





