नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान पाहून सरसकट पंचनामे करण्याच्या आमदार लंघे यांच्या सूचना
Updated On:

नेवासा: नेवासा तालुक्यात १३ व १४ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाला पंचनामे करण्याचे आदेश दिले.
मात्र, पथकाने केवळ ६५ टक्के पर्जन्यमान झालेल्या शेतकऱ्यांच्याच पिकांचे पंचनामे सुरू केल्याने इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होत होता.याबाबत आमदार लंघे-पाटील यांनी पुन्हा पुढाकार घेत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांना ६५ टक्के पर्जन्यमानाची अट न ठेवता प्रत्यक्ष नुकसान पाहून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.





