Pune: ‘त्या’ घटनेनंतर ‘ससून पोलिस गार्ड’साठी आयुक्तांकडून ‘समिती’ स्थापन

पुणे – ससून पोलिस गार्डसाठी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समीती ससूनमधील कैदी वार्ड क्रमांक सोळाची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहणी करणार असून, तेथे लावण्यात येणार्या पोलिस गार्डच्या कर्तव्याचा देखील आढवा घेऊन आयुक्तांना अहवाल सादर करणार आहे.
अपर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, विशेष शाखेचे उपायुक्त आर राजा या तिघांचा या समीतीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
ससून ड्रग रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केल्यानंतर मुख्य सुत्रधार ललीत पाटील याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. पाटील वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. त्याने पळ काढला त्यावेळी कर्तव्यावरी पोलिसांचा मोठा गाफीलपना दिसून आला. त्याच्या पलायनाची माहिती देखील नियंत्रण कक्षाला उशीरा देण्यात आली.
दरम्यान, आत्तापर्यंत या प्रकरणात एका महिला पोलिस अधिकार्यासह 9 कर्मचार्यांना पोलिस आयुक्तांनी निलंबीत केले आहे. तर त्या वार्डमध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या गार्डची दररोज तपासणी करण्याच्या सुचना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्ताना दिल्या आहेत. त्याच्या नोंदी ठेवण्यास सांगितले आहेत. तसेच अपर पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना सरप्राईज व्हिजीट देण्यास सांगितले आहे.





