Market Yard : भुसार बाजारातून आकारणाऱ्या युजर चार्जेस बाबत लवकरच निर्णय; पणन मंत्र्यांकडे समिती देणार अहवाल
Market Yard : मुख्यमंत्र्यांकडे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा पाठपुरावा

मार्केट यार्ड – पणन संचालक यांनी परिपत्रक काढून भुसार बाजारात एक टक्का युजर चार्जेस लावण्याबाबत काढलेल्या परिपत्रकानंतर व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला.
हा वाद पणनमंत्री यांच्यासमोर गेल्यानंतर त्यांनी व्यापाऱ्यांची बाजू समजून घेत सदर विषयात समिती स्थापन करून अहवाल देण्यास सांगितले. समितीची चर्चा सुरू असून यावर लवकरच निर्णय होईल.
आमदार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रीय बाजार समिती जाहीर करावी, अशी थेट मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, त्याबाबतही मिसाळ यांचा पाठपुरावा सुरू आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार विभागात अनियमित शेतीमाल आणि आनुषंगिक वस्तूंवर एक टक्का युजर चार्जेस लागू करण्याचा निर्णय हा केवळ महसूल वाढीचा विषय नाही तर तो संपूर्ण पारंपरिक व्यापार व्यवस्थेवर परिणाम करणारा निर्णय ठरू शकतो.
भुसार बाजारातील व्यापार कमी होण्याची शक्यता
गेली अनेक वर्षे व्यापारी संघटना, विशेषतः दि पूना मर्चंटस् चेंबर, या निर्णयाविरोधात सातत्याने भूमिका मांडत आहे. मात्र, व्यापाऱ्यांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून हा निर्णय पुढे रेटला जात असल्याने बाजार व्यवस्थेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे भुसार बाजारातील व्यापार कमी होण्याची शक्यता आहे.
युजर चार्जेसचा अतिरिक्त भार व्यापाऱ्यांवर पडणार आहे तर याची वसुली शेवटी सर्वसामान्य ग्राहकांकडूनच दरवाढ स्वरूपात केली जाणार आहे. बाजारातील परिस्थिती आज आधीच कठीण आहे, अशा वेळी आणखी एक टक्का युजर चार्जेस लादल्यास त्याचा थेट परिणाम डाळी, साखर, खाद्यतेल, रवा, आटा, मैदा यांसारख्या वस्तू महाग होण्यावर होऊ शकतो. त्याचा फटका सामान्य कुटुंबांना बसणार हे उघड आहे.
बाजार समितीकडून आधीच व्यापाऱ्यांकडून भूखंडनिहाय देखभाल शुल्क आकारले जाते. मग त्याच व्यापारावर पुन्हा उलाढालीनुसार शुल्क आकारण्याची गरज काय, असा प्रश्न व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जावू लागला आहे.
विशेष म्हणजे अनेक वस्तूंवर आधीच ५ ते १८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारला जातो. त्यामुळे युजर चार्जेस हा प्रत्यक्षात दुहेरी आर्थिक भार ठरणार आहे, हे अन्यायकारक आहे असे स्पष्ट मत व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
बाजार समिती व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी…
टाटा कंपनीचे ९०च्या दशकातील प्रमुख जे.आर.डी.टाटा यांचा व्यवसाय स्पर्धेतील एक गुरू मंत्र होता की, बिजनेस मे सिने मे जिगर और अपोजिशन पे नजर होनी जरुरी है, मात्र करोडोंच्या उलाढाल असलेल्या भुसार बाजारात मात्र व्यापाऱ्यांचे अपोजिशन हे बाजार समिती झाले.
व्यवसाय स्पर्धेपेक्षा समितीच्या किचकट नियमांचा त्रास होत असल्याने व्यापारी त्रस्त होत आहे, अशीच भावना स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याने व्यापाराची प्रगती आणि विकास खुंटला आहे.
हेही वाचा:






