पुणे जिल्हा | खारावडे येथील म्हसोबा देवाला वज्रलेपचा निर्णय

पौड, (वार्ताहर) – महाराष्ट्रतील स्वयंभु व जागृत सुप्रसिद्ध असे खारावडे (ता. मुळशी ) येथील श्री म्हसोबा मंदिराचा गर्भगृहाचा मुख्य दरवाजा १२ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत बंद राहणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्षा मधुरा भेलके यांनी दिली.
याबाबत मधुरा भेलके यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील स्वयंभू असे म्हसोबा देवस्थान असून ब वर्ग तीर्थक्षेत्रात मोडते. या ठिकाणी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामस्थांच्या सहमतीने श्री म्हसोबा देवाचे वज्रलेप करण्याचे ठरवले आहे. येथील वज्रलेपाचा विधी हा वज्रलेप तज्ज्ञ देवशिल्पी राजाभाऊ सोमवंशी हे करणार आहेत. त्यासाठी मंदिरातील सर्व धार्मिक विधी सोमवार (दि. ११) मार्च करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ एप्रिलपर्यंत श्री म्हसोबा मंदिराचा मुख्य दरवाजा बंद राहणार आहे.
महाराष्ट्रातून व पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री म्हसोबा भैरवनाथ काळुबाई शंकर मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच खारावडे या देवस्थानचा गेल्या काही वर्षांपासून कायापालट झाला आहे. येथील मंदिराच्या परिसरातील पशुहत्येला बंदी घालण्यात आली आहे. देवाच्या वार्षिक उत्सवाला या वर्षी विविध कार्यक्रम उत्साहात होणार आहे.





