पुणे – डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित डेक्कन जिमखाना करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत डेक्कन जिमखाना क्लबच्या अ आणि ब या दोन्ही संघांनी अनुक्रमे क्लब ऑफ महाराष्ट्र आणि पीवायसी हिंदू जिमखाना या संघांचा पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
डेक्कन जिमखाना क्लब आणि पीवायसी हिंदू जिमखानाच्या मैदानांवर झालेल्या सामन्यात दिपक डांगी याच्या अचूक गोलंदाजी आणि फलंदाजांच्या स्फोटक खेळीमुळे डेक्कन जिमखाना क्लब अ संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात उपांत्य फेरीत जाण्यासाठी डेक्कन जिमखानाला सामना सरस धावगतीच्या आधारे जिंकणे गरजेचे होते.
पहिल्यांदा फलंदाजी करताना क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने १४४ धावांचे आव्हान उभे केले. दिव्यांग हिंगणेकर याने ३० धावांची आणि शुभम रांजणे याने २९ धावांची खेळी केली. दिपक डांगी याने १८ धावात ३ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केले. धीरज फटांगरे (४४ धावा), क्रिश शहापुरकर (नाबाद ४२ धावा) आणि सुरज शिंदे (३९ धावा) यांनी स्फोटक फलंदाजी करून डेक्कन जिमखाना क्लबला केवळ ९ षटकामध्ये विजय मिळवून दिला.
सोहम कुमठेकर याच्या अष्टपैलू खेळीमुळे डेक्कन जिमखाना ब संघाने पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचा १९ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना क्लब ब संघाने १६३ धावा धावफलकावर लावल्या. राहूल त्रिपाठी याने ४१ धावांची तर, अथर्व वानवे याने ३५ धावांची खेळी केली. सोहम कुमठेकर याने २६ धावा आणि अमित निंबाळकर याने २१ धावांचे योगदान दिले. या आव्हानासमोर पीवायसी हिंदू जिमखानाचा डाव १४४ धावांवर मर्यादित राहीला. कर्णधार रोहन दामले याने ४९ धावांची खेळी केली. सोहम कुमठेकर आणि संस्कृत गायकवाड या दोघांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला.