दुर्दैवी ! लग्नात ‘सप्तपदी’ चालताना वधूचा मृत्यू; वराने घेतले नवरीच्या बहिणीसोबत फेरे

इटावा – देशात करोना महामारीची तीव्रता कायम असली तरी देशात लग्न समारंभाचे प्रमाण काही कमी झालेले नाही. अशा लग्न समारंभात अनेक विचित्र गोष्टी घडताना दिसतात. असाच एक प्रकार इटावा शहरात नुकताच घडला आहे. लग्नाचे विधी सुरू असतानाच वधु चक्कर येऊन कोसळली आणि तिचा त्याचठिकाणी मृत्यू झाल्यानंतर वराने त्याच मंडपामध्ये वधूच्या बहिणीशी लग्न केले.
या लग्न समारंभातील नियोजित वधुवर जेव्हा सर्व विधी पार पाडून सप्तपदीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत असतानाच अचानक वधू चक्कर येऊन खाली कोसळली आणि त्याच ठिकाणी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर वधू आणि वर यांच्या कुटुंबीयांनी एकत्र चर्चा करून मृत वधूच्या बहिणीशी या वराचे लग्न करून देण्याचा निर्णय घेतला.
या लग्न समारंभातील वराचे नाव मनोज कुमार असून त्याच्या मृत वधूचे नाव सुरभी असे होते. या वराने ज्या आपल्या मृत वधूच्या बहिणीशी लग्न केले तिचे नाव निशा असे आहे. लग्न समारंभ संपूर्ण पार पाडल्यानंतर सुरभीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशा प्रकारचा निर्णय घेणे आमच्यासाठी जड होते पण व्यावहारिक विचार करून आम्ही हा निर्णय घेतला अशी माहिती सुरभीचे काका अजब सिंग यांनी दिली.
ज्या ठिकाणी लग्न होणार होते त्या ठिकाणच्या जागेमध्ये एका खोलीत सुरभिचा मृतदेह असतानाच दुसऱ्या खोलीमध्ये आम्ही लग्नसमारंभ करत होतो, अशी माहितीही त्यांनी दिली.





