Electrocution Death: तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ! गोठ्यात दूध काढण्याचे यंत्र सुरू करताना विजेचा धक्का
Electrocution Death: सोमवार सकाळी ७ च्या सुमारास घडली दुर्घटना; मिल्किंग मशीन सुरू करताना अचानक विजेच्या बोर्डाचा बसला मोठा धक्का.
Updated On:

Electrocution Death – आंबेगाव तालुक्यातील कोल्हारवाडी (दत्तनगर) येथील ३० वर्षीय तरुण शेतकरी आकाश दिलीप एरंडे हे गोठ्यात दूध काढण्याचे यंत्र सुरू करताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि.६ रोजी सकाळी घडली असून मंचर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश एरंडे हे सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी गेले होते.
दूध काढण्याचे यंत्र सुरू करत असताना विजेच्या बोर्डाचा जोरदार धक्का लागल्याने ते गंभीर जखमी झाले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने पेठ येथील खाजगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी मयत आकाश एरंडे यांचा चुलत भाऊ श्याम वामन एरंडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली असून मृत्यूबाबत कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचे नमूद केले आहे. मंचर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.





