Nagar | कपाशी पिकांवर मर व मुळकुज्यांचे थैमान

कोरडगाव (वार्ताहर)- पाथर्डी तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. कापूस पिकावर मुळकुज्या, मर रोगाने थैमान घातले आहे. तालुक्यात एकूण 33 हजार हेक्टरपैकी 29 हजार हेक्टरवर कपाशी लागवड असून कपाशी पिक एक दिवसात उद्ध्वस्त झाले आहे.
कपाशी पिक रातोरात होत्याचे नव्हते होताना पाहून शेतकरी हतबल झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या पिकांचे पंचनामे तसेच मुळकुज्या तसेच मर रोगाने उद्ध्वस्त झालेल्या कपाशी पिकांचे पंचनामे करून एकरी ५० हजार रुपयापर्यंतचे अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कपाशी हे मुख्य पिक असून, मागील आठ दिवसांपासून या तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. अनेक शेतकऱ्यांचे कपाशी, उडीद, बाजार, मुग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, मुग, उडीद काढून झाकल्याने कऱ्हे उगवण्यास सुरुवात झाली आहे.
त्यातच अधिकच्या पावसामुळे कपाशी पिकांवर मर व मुळकुज्या रोगाने थैमान घातले आहे. शेकडो हेक्टर कपाशी यामुळे बाधित झाली आहे. कपाशी पिकावर औषधासाठी मोठा खर्च झाला आहे.
आता फक्त वेचणी बाकी असताना रोगाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघाल्यामगत परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील 29 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्याची माहिती पाथर्डी तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
या रोगामध्ये कपाशी पिकांची मुळे कुजली जातात. मृत होतात आणि उभे असलेले झाड शेंडयाकडून सुकण्यास सुरुवात होत आहे. एकाच दिवसांत सदरचे झाड पूर्णपणे जळून जाते.
यावर्षीच्या कपाशीच्या बियाणातील दोषामुळे असा प्रकार घडला असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे. या रोगामुळे शेतकऱ्यांना सदरच्या कपाशीला लागण झाली, हे सुध्दा कळणे आणि त्यावर उपाय करणे शक्य होत नाही.
या रोगांची लागण झालेल्या कपाशीचे झाडाचे एकही बोड फुटत नाही. त्यामुळे एक रुपयाचेही उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती लागण्यात नसल्याने झालेला खर्च आणि केलेली मशागत पुर्णपणे वाया गेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका तसेच स्थानिक सोसायट्यांकडून या पिकांसाठी घेतलेले पिक कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.
त्यामुळे शासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन बी-बियाणे, औषधे आणि मशागतीसाठी झालेल्या खर्च पाहता किमान ५० हजारांची एकरी मदत करण्याची गरज असल्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
अचानक आलेल्या मर व मुळकुजवर 200 ग्रॅम युरिया व 100 ग्रॅम पांढरा पोटॅश व 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लाराईड प्रती 10 लिटर पाण्यातून प्रत्येक झाडास 100 मिलीची आळवणी करावी. अतिरिक्त पाण्याचा तात्काळ निचरा करा सुधीर शिंदे, तालुका कृषि अधिकारी, पाथर्डी
कपाशी तसेच इतर पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. आमदार मोनिका राजळे





