Nagar | शेवगाव-पाथर्डीतील भाजप पदाधिकार्यांचा वाद चव्हाट्यावर

नगर, (प्रतिनिधी) – आगामी विधानसबेच्या तोडावर भाजपकडून उमेद्वारांची चाचपणी सुरु केली आहे. मात्र शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील आमदार मोनिका राजळे समर्थक व माजी जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे समर्थक यांच्यातील असलेला अंतर्गत वाद हा पक्ष निरीक्षकांच्या समोरच चव्हाट्यावर आला आहे.
त्यामुळे सुरु केलेली मतदान प्रक्रिया तुर्तास तहकूब करण्यात आली असून पक्ष निरीक्षक अरूण साने यांनी ही निवडणूक वरिष्ठांच्या कोर्टात लोटली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावर हा वाद उफाळल्याने नगरसह शेवगाव-पाथर्डी मतदार संघात एकच चर्चेचा विषय बनला आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात इच्छुक उमेद्वांची नावे व पदाधिकाऱ्यांच्या मनातील उमेदवार जाणून घेण्यासाठी तसेच कोणताही वाद किंवा तक्रारी येवू नये, यासाठी लोकशाहीच्या मार्गाने ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
त्यासाठी शेवगाव- पाथर्डी मतदार संघातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांची नावे जाणून घेण्यासाठी भाजपाचे पक्ष निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर येथील शासकीय विश्राम गृह येथे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
त्यानंतर पदाधिकार्यांकडून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण असवा यासाठी पसंतीक्रमाने तीन नावे लिहून ती लिफाफ्यात बंद करून पक्ष निरिक्षक यांच्याकडे सुर्पूद करावयाची होती.
यासाठी पक्षाकडून अरूण साने हे निरिक्षक पाठवण्यात आले होते. ही प्रक्रिया सुरू असतांना शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात पदाधिकारी नसणारे व्यक्ती हे विधानसभेसाठी इच्छुकांची नावे लिहून देत असल्याचा आक्षेप शेवगावचे भाजपचे तुषार वैद्य, अरूण मुंडे आणि पाथर्डीचे गोकुळ दौंड यांनी आमदार राजळे यांच्या गटावर घेतला.
यावेळी आ. राजळे पक्षपाती करत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. यावरून दोन गटात चांगलाच वाद उडाल्याचे दिसून आले.
तर काही पदाधिकार्यांना जाणीवपूर्वक मुलाखतीबाबत कळवण्यातच आले नसल्याचे पदाधिकार्यांचे म्हणणे यावेळी होते. मुलाखती सुरू असताना गोंधळ झाल्याने काही काळ साने यांनी कामकाज थांबवले होते. या गोंधळामुळे शेवगाव-पाथर्डीतील भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह पुन्हा समोर आला.
या बैठकीत मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पसंती क्रमांकाने मतदान करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी भाजपच्या आमदार मोनिका राजळे व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.
मुंढे समर्थकांच्या अनेक पदाधिकार्यांना या प्रक्रीयेपासून डावलण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे हा वाद उफाळला.
त्यानंतर पक्ष निरीक्षक यांनी ही निवडणूक प्रक्रीया वरिष्ठांच्या कोर्टात लोटली असून त्यांच्या आदेशाने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आगामी विधान सभा निवडणूकीत भाजप मधील वाद वरिष्ठ सोडतील का याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.





