Nagar | विधानसभेच्या मैदानात उतरल्या सहा रणरागिणी

नगर, {जयंत कुलकर्णी} – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच राजकीय पक्षांनी महिलांना मोठी संधी दिली आहे. यावेळी तब्बल सहा रणरागिणी विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत.
महाविकास आघाडीने तीन तर महायुतीने दोन महिलांना संधी दिली आहे. तर एक महिला अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहे. त्यात केवळ एक महिला अशी आहे की यापूर्वी कोणतीही निवडणूक न लढत थेट विधानसभेच्या रिंगणात उतरली आहे.
उर्वरित पाच महिलांपैकी एक दहा वर्षापासून आमदार आहे. तर चारही महिला जिल्हा परिषद निवडणूक लढल्या आहेत. अर्थात दि. 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीनंतर निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे. पण या सर्व महिलांना पक्षांनी अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या महिला निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्टच आहे.
2014 मध्ये भाजपने शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून मोनिका राजळे व कोपरगावमधून स्नेहलता कोल्हे यांना संधी दिली होती. या निवडणुकीत राजळे व कोल्हे या दोघांही आमदार झाल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये केवळ शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आ. राजळे या एकमेव महिला निवडणूक रिंगणात होत्या.
त्याही भाजपच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढल्या. आणि आमदार झाल्या होत्या. या वेळी 2024 मध्ये मात्र बदलत्या राजकीय समिकरणानुसार विधानसभा निवडणुकीत काँगे्रेस, भाजप, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी महिलांना संधी दिली आहे.
त्यामुळे अधिकृत पक्षाच्या पाच महिला उमेदवार आहेत. एक अपक्ष महिला रिंगणात उतरणार आहे. भाजपने दोन महिलांना संधी दिली आहे. त्यात शेवगाव-पाथर्डीतून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना हॅट्ट्रिक करण्याची तर श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
आ. राजळे या तर दाह वर्ष आमदार होत्या. तर प्रतिभा पाचपुते या जिल्हा परिषद निवडणूक लढल्या असून त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या.
याच श्रीगोंदा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाने अनुराधा नागवडे यांना उमेदवारी दिली आहे. नागवडे या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समित्या सभापती राहिल्या आहेत. तर पारनेरमधून राणी लंके यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्या देखील जिल्हा परिषद सदस्य होत्या. तर शिर्डी मतदारसंघात काँगे्रसने प्रभावती घोगरे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.
घोगरे या यापूर्वी कोणतीही निवडणूक लढल्या नाही. त्या थेट विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर काँगे्रसच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे नाही तर राज्याचे लक्ष लागणार आहे.
तर शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष म्हणून हर्षदा काकडे या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी यापूर्वी चार जिल्हा परिषद निवडणूक लढल्या असून त्या जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत.
या निवडणुकीत प्रतिभा पाचपुते व अनुराधा नागवडे यांच्या सरळ लढत श्रीगोंदा मतदारसंघात होणार आहे. त्याप्रमाणे शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आ. मोनिका राजळे व हर्षदा काकडे अशी लढत आहे. शिर्डी प्रभावती घोगरे यांच्या लढत राधाकृष्ण विखे तर पारनेरमध्ये राणी लंके यांनी काशीनाथ दाते यांच्याची लढत होत आहे.




