Nagar | तिसगाव ते पैठण राज्यमार्ग होणार सिमेंट काँक्रीट

शेवगाव, (प्रतिनिधी) – तिसगाव ते पैठण राज्यमार्ग सिमेंट काँक्रेट होणार आहे. हॅम मॉडेल अंतर्गत २०५ कोटींच्या ४२ किलोमीटर अंतराच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याने या रस्त्याची दैना नाहीशी होणार असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली .
गेल्या काही वर्षापासून तिसगाव ते पैठण रस्ता वाहतुकीस अत्यंत खडखड झाला होता. वाहनांसह प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला तर पैठणपर्यंत प्रवासास वेळ लागत असे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविने आणि परत खड्डे होणे हे ठरलेलेच होते.
यामुळे काही आरोपही केले गेले. गतवर्षी पैठण, तिसगाव, गेवराई, नेवासा या राज्यमार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्याने प्रवासाचा त्रास कमी झाला. मात्र, शेवगाव शहरातून जाणारे रस्ते पक्के व्हावेत, यासाठी आमदार जळे यांचे प्रयत्न सुरू होते.
आमदार राजळे यांची शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या हद्दीतील तिसगाव,अमरापूर ,शेवगाव , पैठण ,अंबड ,नांदेड ,धर्माबाद ४२ कि.मी. प्ररामा.८ ते वाबोंरी, खोसपुरी ,मिरी ,माका ,शेवगाव रामा ५२ हा ४२.६०० कि.मी. आणि शहापूर ,संगमनेर ,श्रीरामपुर , नेवास , शेवगाव ,माजलगाव रामा. ५० हा ४९.२०० कि.मी. हे रस्ते हॅम मॉडेल अंतर्गत मजबुत करण्याची शासनाकडे मागणी होती.
त्यानुसार या मार्गांचा सर्व्हे करण्यात आला. यापैकी तिसगाव ,अमरापूर , पैठण राज्यमार्ग क्रं.६१ मार्गाच्या कामास फेब्रुवारी २०२४ मध्ये मंजुरी मिळाली. २०५ कोटी ६० षाख रुपये खर्चाच्या ४१.८०० कि.मी कामाची जुलै २०२४ मध्ये टेंडर प्रक्रिया पुर्ण झाली आहे.
सदर काम हे एस..ए.सांवत कंपनी, नाशिक यांना मिळाले. १५ दिवसांत काम आरंभ होण्याचा आदेश प्राप्त होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्य महामार्ग २२२ तिसगाव ते अमरापूर, शेवगाव, पैठण राज्यमार्ग ६१ असा ४१. ८०० कि.मी हा मार्ग संपूर्ण सिमेंट काँक्रेटमध्ये १० मीटर रुंदीचा होणार आहे. यामधील असणाऱ्या छोट्या मोठ्या नदी, नाल्यावरील पुलांचे बांधकामही होणार आहे.
तर शेवगाव शहरात दत्त मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यापासून नित्यसेवा हॉस्पिटलपर्यंत दुभाजक बसविले जाणार आहेत. हा रस्ता सिमेंट काँक्रेटचा होणार असल्याने सुखकर प्रवासाबरोबर मार्गालगत व आसपासच्या गावातील बाजारपेठ वाढण्यास मदत होणार असल्याचे आमदार राजळे म्हणाल्या.





