बीडमध्ये पुन्हा खळबळ..! खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; १५ जणांच्या टोळक्याने कोयते-कुऱ्हाडीने अमानुष मारहाण, चार महिला रक्तबंबाळ

Beed Crime : बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जाणारा सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोरांनी दांडके, कोयते आणि कुऱ्हाडीचा वापर करून महिलांवर थेट डोक्यावर, पाठीवर आणि पायांवर वार केले.
ही भयानक घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये घडली. मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास १० ते १५ जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. महिलांनी मदतीसाठी ओरडल्या, किंकाळ्या फोडल्या, तरीही हल्लेखोर थांबले नाहीत. जखमींनी रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. शिरूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात समोर आले आहे की, हल्लेखोरांनी “अनेकदा सांगितले तरी या ठिकाणी का राहता?” असे म्हणत मारहाण केली. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
खोक्या भोसले कोण?
सतीश उर्फ खोक्या भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेला खोक्या भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर त्याचे दहशत पसरवणारे व्हिडिओ व्हायरल झाले होते. वनविभागाच्या कारवाईत घरात सापडलेल्या ऐवजामुळे तो चर्चेत आला. बुलढाण्यात कैलास वाघ या तरुणाला बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणात बीड न्यायालयाने नुकताच त्याला जामीन मंजूर केला आहे.





