सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणी वाढल्या? जामीन मिळताच पुन्हा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

बीड : बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सदस्य सध्या याच कारागृहात शिक्षा भोगत असताना, कारागृहातील एक नवीन प्रकरणाने खळबळ उडवली आहे.
अज्ञात व्यक्तीने कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकल्याने चार न्यायाधीन बंदिवानांमध्ये वाटपावरून जोरदार हाणामारी झाली. यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत चेंडू ताब्यात घेतला, मात्र बंदिवानांनी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत पुन्हा गोंधळ घातला.
गांजा वाटपावरून राडा
हा धक्कादायक प्रकार बीड जिल्हा कारागृहात घडला, जिथे एका अज्ञात व्यक्तीने गांजा भरलेला चेंडू आत फेकला. हा चेंडू मिळवण्यासाठी बंदिवानांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. कारागृह कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत चेंडू ताब्यात घेतला, पण यामुळे संतापलेल्या बंदिवानांनी कर्मचाऱ्यांवरच हल्ला चढवला आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणाने कारागृह प्रशासनाची झोप उडवली आहे.
खोक्या भोसले पुन्हा अडचणीत
या प्रकरणी कारागृह प्रशासनाने तातडीने जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने कारागृहात जाऊन पंचनामा केला, तेव्हा गांजा बंदिवानांनीच मागवल्याचे उघड झाले. याप्रकरणी खोक्या भोसले उर्फ सतीश भोसलेसह तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खोक्या भोसले यापूर्वी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अटक झाला होता आणि त्याला जामीन मिळाला होता. मात्र, या नव्या प्रकरणामुळे त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
यापूर्वीही गांजा प्रकरण
काही दिवसांपूर्वीच बीड कारागृहात गांजा सापडल्याने खळबळ उडाली होती. सुभेदार बलभीम चिचाणे आणि पोलीस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज यांनी बराक क्रमांक 7 मधील बंदी अक्षय ऊर्फ चिंटू मिठ्ठू गायकवाड याच्या संशयास्पद हालचालींवरून त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या अंडरविअरमध्ये गांजासदृश पदार्थ असलेला रबरी बॉल आणि पँटच्या खिशात हिरवट रंगाचा पाला, बिया आणि बोंडे असलेला अंमली पदार्थ आढळला. हा मुद्देमाल जप्त करून अक्षयविरुद्धही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह
बीड जिल्हा कारागृह सातत्याने अशा प्रकरणांमुळे चर्चेत राहत आहे. गांजा प्रकरण, हाणामारी आणि कर्मचाऱ्यांना धमक्या यामुळे कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, कारागृह प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अधिक कठोर कारवाईच्या तयारीत आहे.





