प्रभात वृत्तसेवा यवत – दौंड तालुक्यातील खुटबाव ते हडपसर अशी ग्रामीण भागासाठी पीएमपीएलची बससेवा दि.२६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून खुटबाव नाथाचीवाडी,लडकतवाडी,गाडमोडी, खामगाव उंडवडी परिसरातील नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता सपंली आहे. या पीएमपीएल बससेवेचा शुभारंभ माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातील खुटबाव ते नाथाचीवाडी, लडकतवाडी, भोसलेवाडी, तांबेवाडी व खामगाव फाटा या गावातील ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांना या बसमार्गाचा फार मोठा फायदा होणार असून हडपसर ते खुटबाव ही बससेवा सुरू करण्याची मागणी माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडे केली होती. त्यानुसार रमेश थोरात आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता खुटबाव गावात मुख्य चौकात माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते बससेवेचे उद्घाटन केले.यावेळी खुटबाव गाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पीएमपीएल बस चालक व वाहक यांचे रमेश थोरात व ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. “या बससेवेमुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.खुटबाव ते हडपसर मार्गे या बस सेवेमुळे परिसरातील नागरिकांचा,आणि विद्यार्थ्यांचा प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सर्व नागरिकांनी व परिसरातील विद्यार्थी, शेतकरी पदाधिकाऱ्यांनी यांनी या बससेवेचा लाभ घ्यावा. ही बस सेवा कायमस्वरूपी व्यवस्थित सुरू राहील याची काळजी घ्यावी.” – रमेश थोरात, माजी आमदार, दौंड