Pune Temperature : पुणे झाली ‘हॉट सिटी’! लोहगावचा पारा ४३.८ अंशांवर; शिवाजीनगरमध्येही मोडला रेकॉर्ड
Pune Temperature : लोहगावमध्ये मोसमातील सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; प्रखर उन्हामुळे जनजीवन विस्कळीत.

Pune Temperature – शहरातील उष्णतेची तीव्रता कायम असून सोमवारीही पुणेकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. शहरातील बहुतांश भागांत तापमानात वाढ नोंदवण्यात आली असून लोहगाव येथे सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगरमध्ये पारा ४१.४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर तुलनेने कमी वर्दळ दिसून आली.
गेल्या काही दिवसांपासून शहरात सकाळपासूनच कडक ऊन पडत असून दुपारनंतर उष्ण वाऱ्यांचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: दुचाकीस्वार, बांधकाम मजूर आणि उघड्यावर काम करणाऱ्या नागरिकांना याचा अधिक फटका बसत आहे. दुपारच्या वेळेत अनेक ठिकाणी रस्ते तुलनेने ओस पडल्याचे दिसून येते.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. सोमवारीदेखील काही भागांत ढग दाटले होते. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने वाढत्या उष्णतेपासून कोणतीही दिलासा पुणेकरांना मिळाला नाही. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमान उच्चांकी पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
सोमवारचे तापमान
लोहगाव ४३.८, शिवाजीनगर ४१.४, चिंचवड ४०.७, मगरपट्टा ४०.८, एनडीए ३९, हडपसर ४०.१, दौंड ४०.६, हवेली ४०.५, राजगुरूनगर ४०.५, माळीण ३८.१





