Shamishka Abacus Medal : जपानमध्ये दौंडच्या शमिष्काचा डंका! आंतरराष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत पटकावले रौप्य पदक
Shamishka Abacus Medal : दौंडच्या शमिष्का हिने जपानमध्ये पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या 'वर्ल्ड कप सिटी ॲबॅकस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत' अभूतपूर्व कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे.

Daund Shamishka Kulkarni Wins Silver Medal In World Cup City : पुण्यातील दौंड शहराचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. दौंड शहरातील रहिवासी संजय कुलकर्णी यांची सुकन्या शमिष्का (ऊर्फ श्रावणी कुलकर्णी) हिने जपानमध्ये पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘वर्ल्ड कप सिटी ॲबॅकस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत’ (World Cup City Abacus International Competition) अभूतपूर्व कामगिरी करत रौप्य पदक (Silver Medal) पटकावले आहे. तिच्या या यशाने दौंड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जपानमधील ताकासाकी अरेना येथे रंगला थरार –
ही जागतिक दर्जाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा नुकतीच जपानमधील प्रसिद्ध ‘ताकासाकी अरेना’ येथे पार पडली. या स्पर्धेत जगभरातील अनेक देशांतील हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या आणि कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत शमिष्काने आपल्या तल्लख बुद्धिमत्ता, विलक्षण वेगवान गणनकौशल्य (Fast Calculation Skills) आणि उत्तम एकाग्रतेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना नमवत उत्कृष्ट कामगिरी केली अन् रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव –
आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदीप्यमान यश संपादन करून मायदेशी परतलेल्या शमिष्काचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल शिवशक्ती सेवा मंडळाच्या वतीने शमिष्का आणि तिच्या संपूर्ण परिवाराचा विशेष सन्मान करून अभिनंदन करण्यात आले. तसेच दौंड शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.




