Daughter Kills Father : धक्कादायक घटना! आईच्या डोळ्यांसमोर मुलीने वडिलांना संपवलं, काय आहे कारण?
Daughter Kills Father : घरगुती वादातून स्वयंपाकघरातील चाकूने छातीवर केला वार; रुग्णालयात नेण्यापूर्वीच अतिरक्तस्रावामुळे वृद्धाने सोडले प्राण.

Daughter Kills Father – दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणातून मुलीने आपल्या वडिलांचा चाकूने छातीत वार करून खून केला. जैनुद्दीन दस्तगीर फुलारी (७०, रा. कसेवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी, खडक पोलिसांनी दिलशाद जैनुद्दीन फुलारी (४०, रा. पोलीस चौकीच्या समोर, कसेवाडी) हिला अटक केली आहे. हा प्रकार काशीवाडी पोलिस चौकीच्या समोर त्यांच्या राहत्या घरात रविवारी रात्री ११ वाजता घडला.
याप्रकरणी जैनुद्दीन यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनुद्दीन, त्यांची पत्नी आणि मुलगी दिलशाद फुलारी हे एकत्र राहतात. त्यांची मुले वेगळी राहतात. दिलशाद हिचा विवाह झाला नाही. जैनुद्दीन फुलारी हे दारू पिऊन घरी आले. त्यांनी दिलशाद हिला शिवीगाळ करू लागले. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली.
तेव्हा रागाच्या भरात घरातील किचन ओट्यावर ठेवलेला कांदा कापण्याचा धारदार चाकू घेऊन दिलशाद हिने वडिलांच्या छातीवर वार केला. त्यामुळे ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दिलशाद फुलारी हिला अटक केली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक कुलदीप व्हटकर तपास करीत आहेत.




