Nida Khan : बहुचर्चित TCS धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर निदा खान फरार झाली होती. तिच्या मागावर अनेक पोलिस पथके रवाना करण्यात आली होती. अखेर तिला गुरुवारी ७ मे या दिवशी रात्री आठ वाजता छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. 25 मार्चपासून निदा खान पोलिसांना गुंगारा देत फरार झाली होती. निदा खानचा शोध पोलिसांकडून सुरू होता. मात्र, तिचा कुठेही थांगपत्ता लागत होता. अखेर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नाशिक पोलिसांना ती छत्रपती संभाजीनगरमध्ये लपली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुप्तपद्धतीने सापळा रचला. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातील कौसर पार्क येथील एका नातेवाईकाच्या फ्लॅटवर छापा टाकला असता निदा खान तिच्या कुटुंबासमवेत पोलिसांना सापडली. तिला अटक केल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार, निदा खान ज्या ठिकाणाहून तिला ताब्यात घेण्यात आले. तिथे आपल्या कुटुंबातील सदस्यांह ३ ते ४ दिवसांपासून ती वास्तव्यास होती, अशी माहिती समोर आली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी कोणताही गाजावाजा होऊ नये आणि संशयिताला पळून जाण्याची संधी मिळू नये, यासाठी खाकी वर्दी आणि सरकारी वाहनांचा वापर टाळला. तांत्रिक पुरावे जप्त निदा खानला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून मोबाईलसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे देखील जप्त केले आहे. यात दोन स्मार्टफोन नाशिक पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पोलिस तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. टीसीएस कंपनीतील तरुणींवर बलात्कार आणि लैंगिक शोषण करणाऱ्या मुख्य आरोपींना मदत केल्याचा आरोप निदा खानवर आहे. आता या अटकेमुळे नाशिक टीसीएस प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलघडा होणार असल्याचे बोलले जात आहे. हेही वाचा : Anganwadi Workers Protest : जनगणनेच्या कामाला अंगणवाडी सेविकांचा नकार! खेड तहसील कार्यालयाबाहेर संतापाचा उद्रेक..नेमकं प्रकरण काय?