Knife Attack – ट्रिपल राईसची ऑर्डर वेळेत न मिळाल्याच्या कारणावरून दोन जणांनी कोरेगाव शहरातील एका चायनिज हॉटेल चालकावर चाकू व लाकडी दांडक्याने हल्ला केला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार सतीश माने (वय २३, रा. बाबर शोरूमच्या पाठीमागे, कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवन प्रदीप पवार व गणेश पवार (दोघे रा. कुमठे फाटा, कोरेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव येथील जैन मंदिराशेजारी असलेल्या ‘हॉट अँड स्पायसी चायनिज’ हॉटेलमध्ये घडली. फिर्यादी ओमकार माने यांनी संशयितांना ट्रिपल राईसची ऑर्डर तयार होण्यासाठी दहा मिनिटे लागतील, असे सांगितले होते. मात्र, पाच मिनिटात ऑर्डर न मिळाल्याने दोघे जण संतापले. त्यानंतर गणेश पवार याने चाकूने माने यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ओमकार माने यांनी हात आडवा घेतल्याने चाकू त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला लागून छातीवर घसरला. तसेच दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे माने यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. मारहाणीत फिर्यादी ओमकार माने जखमी झाले असून हॉटेलच्या गल्ल्यातील सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपये गहाळ झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हवालदार नागराज कदम तपास करत आहेत.