सुनेने नायलॉन दोरीने गळा आवळून सासूचा केला खून; पुणे जिल्ह्यातील घटना

चाकण – सासूने मुलीला जेवण दिले नाही. या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सुनेने नायलॉन दोरीने गळा आवळून सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री चाकण येथे घडली. याबाबत चाकण पोलिसांनी तपास करत अवघ्या 12 तासात गुन्हा उघडकीस आणून सुनेला अटक केली आहे.
सुषमा अशोक मुळे (वय 71, रा. पंचवटी सोसायटी, झित्राईमळा, चाकण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुवर्णा सागर मुळे (32) हिला पोलिसांनी अटक केली आहे. उपनिरीक्षक विनोद सुभाष शेंडकर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून भांडण होत होते.
गुरुवारी दुपारी सून सुवर्णा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी शेजारी गेली होती. सायंकाळी उशिरा ती घरी आली त्यावेळी तिची मुलगी रडत होती. मुलीला विचारणा केली असता आजीने भाकरी बनवून दिली नाही, फक्त भातच दिल्याचं सांगितले. यावरून सासू-सुनेमध्ये भांडण झाले. दरम्यान सासू भाकरी करत असताना सुनेने तिला बाजूला सारले. यामध्ये दोघीमध्ये चांगलीच झटापट झाली. एकमेकींना खाली पाडले.
यावेळी राग अनावर झाल्याने सून सुवर्णा हिने घरातील नायलॉन दोरीने मागून गळा आवळला. यामध्ये सासू सुषमा या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर तिने पतीला सासू चक्कर येऊन पडल्याचे सांगितले. मुलगा सागर हा कामावरून घरी आला. त्याने आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र आईचा मृत्यू झाला होता. चाकण पोलिसांना माहिती मिळताच रात्र गस्तीवरील उपनिरीक्षक शेंडकर व इतर रुग्णालयात आले. त्यांना संशय आल्याने त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली.
वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांनी तपास सुरु केला. मुलगा सागर याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर सून सुवर्णा हिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिने सासूचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली. तपास सहाय्यक निरीक्षक राठोड करीत आहेत.





