Dashavatar : होय महाराजा.! ‘दशावतार’ची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार; सस्पेन्स वाढवणारा टिझर आउट
Dashavatar Movie : ‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर झळकले असून या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. काळसर रंगाचे रंगवलेले रौद्र रूप, लालसर डोळे आणि विलक्षण कटाक्ष, या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणारी याची उत्कंठा अधिकच वाढते आहे.
सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट कोकणातील प्राचीन दशावतारी परंपरा आणि रहस्यमय पार्श्वभूमी यांचं मिश्रण आहे. पोस्टरमधील चेहरा प्रेक्षकांना अस्वस्थ करतोय, मात्र त्याचवेळी उत्सुकता देखील निर्माण करतोय. मात्र, आता या पोस्टर मागचा चेहरा हा अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचाच आहे यावर शिक्का मोर्तब झाला आहे.
दरम्यान, नुकतंच या सिनेमाचा टिझर देखील प्रेक्षकांच्या भेटला असून, यामध्ये महेश मांजरेकर यांच्या आवाजातील गाऱ्हाणं ऐकू येतंय. दशावताराच्या खेळाकडे वाकडी नजर करणाऱ्यांचं वाटोळं होऊ देत असं गाऱ्हाणं घातल्याचं पाहायला मिळतंय. त्याबरोबरच टीझरमध्ये अनेक गूढ प्रसंग पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढली आहे. सध्या सगळीकडेच या सिनेमाची चर्चा रंगली आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात मराठीतील दिग्गज आणि अत्यंत ताकदीचे कलाकार एकत्र आले असून दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव,विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे अशा दर्जेदार कलाकारांची मांदियाळी या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.
‘दशावतार’ हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून, भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ असावा असं या टिझरमधून लक्षात येत आहे. टीझरमध्ये दाखवलेली दृश्ये गूढता, भव्यता आणि थरार निर्माण करणारी आहेत. प्रत्येक पात्राची झलक दाखवणारा हा टिझर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आणि चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणणारा आहे.





