Dangerous Bridge – कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी-पेंढार गावाजवळील पिंपळगाव जोगा डाव्या कालव्याच्या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पुलावरील अर्ध्याहून अधिक कठडे तुटल्याने हा पूल सध्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला असून, येथे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या महामार्गावर प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातात या पुलाचे कठडे तुटले होते, मात्र त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. सध्या कालव्याला पाणी सुरू असल्याने, कठडे नसलेल्या भागातून एखादे वाहन घसरल्यास मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना पुलाचा अंदाज येत नसल्याने हा धोका अधिकच वाढला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तुटलेले कठडे बसवून त्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स आणि इशारा फलक लावणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुरुस्तीस होणारा विलंब एखाद्या मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकतो, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहून कधी उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.