पुणे जिल्हा | बांध फुटून शेतकऱ्यांचे नुकसान ; रात्रभर बत्ती गुल

राहू, (वार्ताहर)- दौंड तालुक्यात राहू बेट परिसरात रविवार (दि.१६) झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. दिवसभर पाऊस येण्याची शक्यता नसताना सायंकाळी मात्र पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडविली. मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. अनेक विजेचे खांब कोसळल्याने अजून वीज पूर्ववत झालेला नाही. राहू, वाळकी, कोरेगाव भिवर, टाकळी व बेट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतात बांध फुटून नुकसान झाले आहे.
अनेकांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहेत. ऊस लागवडीला धोका निर्माण झाला आहे. नवीन लागवडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर त्या उसाच्या उगवण क्षमतेवर परिणाम होऊन पूर्ण पीक वाया जाण्याची शक्यता आहे.
मोठ्या प्रमाणत पाऊस झाल्याने बाजरीच्या शेतात वाफसा अवस्था येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे बाजरीची पेरणी उशिराने होण्याची शक्यता आहे. दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाडा होता. त्यामुळे आज देखील पावसाची शक्यता नागरिक वर्तवत आहेत. पावसाने काही काळ उघडीप न दिल्यास शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.





