खा. लोखंडे यांच्याकडून नुकसानीची पाहणी !

संगमनेर – तालुक्याच्या सावर चोळ, निमगाव खुर्द, पेमगिरी, मेंगाळवाडी या भागातील गारपिटीने नुकसान झालेल्या कांदा, टोमॅटो व फळ पिकांची खा. सदाशिव लोखंडे यांनी पाहणी करत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
संगमनेर तालुक्यात शेतमालाचे गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आ. बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सावरचोळ, निमगाव खुर्द, पेमगिरी, मेंगाळवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर लगेचच खा. सदाशिव लोखंडे यांनी या गावची पाहणी केली.
दरम्यान, वादळाने अठरा वर्षापूर्वी बांधलेल्या कौलाच्या घराची पाहणी खा. लोखंडे यांनी केली. नुकसान झालेल्या शेतपिकांचे तसेच वादळाने पडलेल्या घरांचे कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामे करावेत. वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर केल्यानंतर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील, असे आश्वासन खा. लोखंडे यांनी दिले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे, राजेंद्र सोनवणे, शहरप्रमुख विकास भरीतकर, महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले, अशोक कानवडे आदी उपस्थित होते.





