Pune district : नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्या

आमदार शरद सोनवणे यांची मागणी
जुन्नर – जुन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची गंभीर दखल घेत, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी तातडीने पत्रव्यवहार केला आहे. या पत्राद्वारे त्यांनी नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. आमदार सोनवणे यांनी दि. २८ रोजी हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
आमदार सोनवणे यांनी पत्रात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणाहून पाणी अद्यापही पूर्णपणे ओसरलेले नाही. पावसामुळे नद्या, ओढे यांमध्ये शेतामधील बांध फुटून अनेक ठिकाणी शेतामध्ये घेतलेली पिके वाहून गेली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अतिवृष्टीमुळे आदिवासी भागातील पारंपरिक पिकांसह इतरही लागवडीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतीमधली माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेली असून पिकांसह मातीचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे जुन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.





