दैनिक ‘प्रभात’तर्फे दीपावलीनिमित्त रंगणार ‘दीपस्वर’ मैफील

पुणे – दैनिक “प्रभात’तर्फे यंदाही दीपावलीच्या निमित्ताने आणि धनत्रयोदशीच्या मंगलप्रभाती (दि. 10 नोव्हेंबर) “दीपस्वर’ या स्वरमैफलीचे आयोजन पहाटे सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले आहे. या सुरेल मैफलीच्या माध्यमातून खास वाचकांसाठी दैनिक “प्रभात’ने दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे प्रयोजन केले आहे.
या कार्यक्रमासाठी “पुनीत बालन ग्रुप’ हे मुख्य प्रायोजक असून “लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि., “युवराज ढमाले कॉर्प.’आणि “डिजिटल प्रभात’ हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. दैनिक “प्रभात’तर्फे दरवर्षी प्रख्यात गायकांचा हा स्वरमेळा आयोजित केला जातो. या “दिवाळीपहाट’ला प्रत्येक वर्षीच रसिकांची भरभरून दाद मिळते. त्यामुळेच आमचा उत्साहही दरवर्षी दुणावतो. यंदाही वाचकांची ही दिवाळी अविस्मरणीय करण्याचा दैनिक “प्रभात’चा मानस असून, दिवाळी पहाटच्या “दीपस्वर’ कार्यक्रमात आपला स्वरसाज चढवण्यासाठी दिग्गज गायक येणार आहेत.
यामध्ये “सारेगमप’च्या मंचावर आपला विशेष ठसा उमटवलेले गायक ज्ञानेश्वर मेश्राम, सोनाली कर्णिक आणि अभिषेक मारोटकर हे गायक या स्वरमैफिलीत सहभागी होणार आहेत. एकापेक्षा एक सुरेल, सरस आणि गाजलेल्या गाण्यांचा मिलाफ या निमित्ताने स्वररसिकांना अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, प्रवेश मात्र आसनक्षमतेनुसार मर्यादित असणार आहे.





