Dahiwadi Murder Case : दहिवडी दुहेरी हत्याकांड! नराधम अक्षय मांजरेची रवानगी येरवडा जेलमध्ये; पण पोलिसांचा ‘हा’ प्लॅन तयार
Dahiwadi Murder Case : दहिवडी येथील दोन बालकांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अक्षय मांजरेला न्यायालयीन कोठडी; येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश.

Dahiwadi Murder Case – दहिवडी (ता. शिरूर) येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय दत्तात्रय मांजरे याला पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन निष्पाप बालकांच्या हत्येचा आरोप असलेल्या या आरोपीच्या कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
सविस्तर माहितीनुसार, १७ मार्च २०२६ रोजी दहिवडी येथे एका अल्पवयीन बालकाचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान पोलिसांनी अक्षय मांजरे याला ताब्यात घेतले असता, त्याने या खुनाची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे, चौकशीत त्याने २१ जून २०२४ रोजी देखील एका दहा वर्षीय बालकाची हत्या केल्याचे मान्य केले.
या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. बालकांच्या हत्येमागील नेमके कारण आणि या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे. कारागृहात रवानगी झाल्यामुळे या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पोलीस घेणार पुन्हा आरोपीचा ताबा
आरोपी अक्षय मांजरे याला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करून तपास करण्यात आला आहे. मात्र, त्याने कबूल केलेल्या दुसऱ्या हत्येचा सविस्तर तपास करण्यासाठी पोलिसांना त्याचा पुन्हा ताबा हवा आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिल्याने त्याची रवानगी कारागृहात झाली असली, तरी दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस पुन्हा न्यायालयाकडे कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्याचा ताबा मागणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.





