Double Murder : नागपूरमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ: जुन्या वैरातून दोघांचा खून, एकाला अटक

नागपूर : नागपूर शहर दुहेरी हत्याकांडाने (Double Murder) हादरले आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक झोपडपट्टीत दोन व्यक्तींवर (Double Murder) जीवघेणा हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात सागर मसराम याचा जागीच मृत्यू झाला, तर लक्ष्मण गोडे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला.
जुन्या वादातून हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर मसराम हा सराईत गुन्हेगार होता. प्राथमिक तपासात ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चंदू नावाच्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास वसंतराव नाईक झोपडपट्टीत ही घटना घडली. मृतक आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते आणि दोन वर्षांपूर्वी ते मित्र होते. मात्र, सागरविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर चंदू त्याच्यासोबत राहत नव्हता. दोन वर्षांपूर्वी एका भांडणादरम्यान चंदूने सागरला मदतीसाठी बोलावले होते, पण तो आला नाही. याचा राग चंदूच्या मनात होता.
वादाचे मूळ आणि हल्ला
मृतकाचा मित्र अबू अझिज बेग याच्याविरुद्ध कोर्टाने कलम ३०२ अंतर्गत वॉरंट जारी केले होते आणि पोलिसांनी त्याला अटक केली होती. दोन दिवसांपूर्वी अझिज आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. चंदूने पोलिसांत तक्रार दिल्याने त्याला अटक झाल्याचा गैरसमज मृतकांना झाला. यानंतर सागर आणि लक्ष्मण आरोपी चंदूच्या घरी गेले आणि त्याला शिवीगाळ केली. संतापलेल्या चंदूने घरातील लोखंडी रॉडने दोघांच्या डोक्यावर वार केले, ज्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
सध्या तपास सुरू
पोलिसांनी चंदूला अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.





