लाखणगाव, (वार्ताहर) – गेल्या काही दिवसांत वाढत्या उष्णतेमुळे थंड पाण्याचा व्यवसाय करणार्या व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले असून थंड पाण्याच्या जारची मागणी वाढली आहे. विजेचा विस्कळीतपणामुळे पाण्याचे जार भरण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार वेळेवर पाण्याचे जार देताना व्यावसायिकांची धांदल उडत असल्याचे पहावयास मिळते. कडक उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना थंड पाण्याला नेहमीच मागणी असते. आंबेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये शुद्ध थंड पाण्याच्या व्यवसाय करणारे व्यावसायिक असून उन्हाळ्यात त्यांना चांगले दिवस आले आहेत. विविध दुकानदार, व्यावसायिक, शेतकर्यांच्याकडून थंड पाण्याच्या जारला मागणी होत आहे. अनेक व्यावसायिक दुकानदारात खरेदी करण्यासाठी येणार्या ग्राहकांना थंड पाणी उपलब्ध व्हावे म्हणून थंड पाण्याचे जार मागत आहेत. तर विविध छोट्या-मोठ्या कंपन्या, हॉटेल, कारखाने यात कामगार व ग्राहकांना देखील थंड पाणी दिले जात आहे. आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जात असल्याने शेतीच्या कामावर येणार्या कामगार महिलांना, पुरुष कामगारांकडून देखील थंड पाण्याच्या थंड पाण्याची मागणी होत असल्याने शेतकरी या कामगार महिलांसाठी थंड पाण्याचे जार उपलब्ध करुन देत आहेत. शुद्ध थंड पाण्याचा जारचा व्यवसाय करणारी व्यावसायिक यांच्याकडे साधा जार 15 तर थंडगार 30 ते 35 रुपयांना दिला जात आहे. उन्हाळ्यात जारची मागणी वाढल्याने जार व्यवसायिकांना चांगले दिवस आले आहेत. ग्राहकांच्या आवडीप्रमाणे थंड पाणी शुद्ध देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहे. थंड पाण्याचा जार 30 ते 40 रुपये प्रमाणे विक्री होत आहे. विजेचा लपंडाव वाढल्यामुळे वेळेत ग्राहकांना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होते. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. – बाबाजी खानदेशे, पाणी जार विक्रेते, मंचर