लाखणगाव, (वार्ताहर) – सध्या ऊस पिकाला हुमणी, उणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून हुमणीने उसाच्या मुळ्या खाल्ल्यामुळे ऊस सुकून गेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात घट होणार असून विविध औषधे सोडून ही उणीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. मुबलक प्रमाणावर उपलब्ध असणारे पाणी व ऊस पिकाला असणारा हमीभाव यामुळे येथील शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य देतात. सध्या अनेक गावांमध्ये लागवड केलेल्या ऊसाला हुमणीचा प्रादुर्भाव जाणवत असून ८ ते १२ महिने वयाच्या ऊसाच्या मुळ्या हुमणीने खाल्ल्याने ऊस वाळून जात आहे. त्यामुळे ऊस वाळल्याने उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात खर्च करून पाण्यातून औषध सोडले जात आहे. तरी हुमणीचा प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे एकंदरीतच उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. यावर्षी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ३ हजार २०० रुपये प्रति टन ऊसाला बाजारभाव दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षी चांगला बाजारभाव मिळेल. अशी शेतकऱ्यांना आशा आहे. परंतु हुमणीचा झालेला प्रादुर्भाव आणि त्यामुळे ऊस वाळत असल्याने करावा लागणारा खर्च व हुमणीचा प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाची नाराजी दिसून येत आहे.