लाखणगाव, (वार्ताहर) – काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने सुभाष संपत जाधव या शेतकऱ्याचा ३६ गुंठे ऊस जळाला असून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या साखर कारखाने सुरू नसल्याने शेतकऱ्यांचा ऊस तोडला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरण प्रशासनाने योग्य दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी जाधव यांनी केली आहे. काठापूर बुद्रुक येथे पांडुरंग वस्ती येथे गट नंबर ४१९ यामध्ये शेतकरी सुभाष संपत जाधव यांनी एक वर्षापूर्वी आडसाली उसाची लागवड केली होती. या उसाच्या शेताच्या वरून विजेच्या तारा गेल्या. या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे .काठापूर बुद्रुक येथे महावितरणाचे मुख्य स्टेशन असल्याने येथून परिसरातील गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब, विजेच्या तारा पसरलेल्या आहेत. अनेकवेळा गावातील शेतकऱ्यांचा ऊस विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून नुकसान होत आहे. शेतकरी सुभाष संपत जाधव यांचा ऊस जळाल्याने नुकसान झाले आहे. प्रशासनाने दखल घेऊन जळालेल्या उसाचा पंचनामा करून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आले आहे.