लाखणगाव, (प्रतिनिधी) – गोठ्याच्या बाहेर युरियाच्या गोणीत असलेला युरिया खाण्यात आल्याने चार गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील चितंबरनगर येथे शनिवार, दि. १४ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की लाखणगाव चितंबरनगर येथे शेतकरी बाळासाहेब महादेव गावडे हे राहत असून त्यांच्याकडे घराच्या शेजारीच गायींचा गोठा असून गोठ्यामध्ये १५ गायी आहेत. शनिवारी सकाळी ते बाजरी करायची असल्याने शेतात गेले होते. त्यावेळी त्यांची मुले व आई घरी होत्या. बारा वाजण्याच्या दरम्यान गोठ्यातील चार गाया मोठमोठ्याने हंबरून तडफडू लागल्याने त्यांच्या मुलांनी बाळासाहेब गावडे यांना फोन करून सांगितले. गावडे हे घरी आले असता गायी तडफडत होत्या. त्यावेळी त्यांनी तात्काळ प्राण्यांचे डॉक्टर निवृत्ती मेहेत्रे व त्यांचे सहकारी यांना माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी येत गायींवर उपचार सुरू केले. त्यावेळी पहिल्यांदा दोन गाई मयत झाल्यावर एक गाई दुपारी तर एक गाई रात्री अशा चार गाई मयत झाल्या असून शेतकरी बाळासाहेब गावडे यांचे अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गोठ्याच्या बाजूला युरियाची गोण ठेवण्यात आली होती. त्या गोणीमध्ये एक दोन किलो युरिया शिल्लक होता. जास्त हवा असल्याने पिशवीचें तोंड काही गाईजवळ गेल्याने गाईने पिशवी ओढून युरिया खाण्यात येऊन गायींचा मृत्यू झाला असावा, असे शेतकरी बाळासाहेब गावडे यांनी सांगितले.