मंचर, (प्रतिनिधी) – लाखणगाव (ता.आंबेगाव) येथील दळेवस्ती बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असल्याची घटना रविवार, दि. १५ रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या हल्ल्याप्रसंगी शेतकऱ्याच्या पाळीव गुड्डी नावाच्या कुत्रीने बिबट्याला प्रतिकार केल्याने मालक असलेला शेतकऱ्याचे प्राण वाचले असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. हनुमंत नारायण टाके (वय ४२) असे हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की शेतकरी हनुमंत नारायण टाके हे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी घराच्या बाहेर आले होते. त्यावेळी ते घराजवळील गोठ्यात बांधलेल्या कुत्रीजवळ गेले असता गोठ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांची मान पकडण्याचा प्रयत्न करत त्यांना खाली पाडले. त्यावेळी बिबट्याने मानेला पकडू नये म्हणून टाके यांनी एक हात बिबट्याच्या तोंडात देत त्याला प्रतिकार सरू केला व त्यांच्यात झटापट सुरू झाली. त्यावेळी त्यांच्या पाळीव कुत्रीने जोरात भुंकत बिबट्याला पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न सुरू केला. हनुमंत टाके व बिबट्याची झटापट सुरू असताना झटापटीचा आवाज ऐकून त्यांची पत्नी आशा टाके घराबाहेर आल्या व समोरचे दृश्य पाहून त्या घाबरल्या. मात्र, त्यांनी जोरजोरात आरडाओरडा करत व काठी आपटत आवाज केल्याने बिबट्याने त्या ठिकाणावरून पळ काढला. मात्र, या हल्ल्यात हनुमंत टाके यांच्या हाताला बिबट्याचे दात व नख्या लागल्याने ते जखमी झाले आहेत. तसेच बिबट्याने त्यांना पायाला धरून ओढण्याचा प्रयत्न केल्याने पायाला देखील जखमा झाल्या आहेत. दरम्यान त्यांनी पाळलेल्या कुत्रीने जोरदार प्रतिकार केल्याने त्यांचा जीव वाचला असल्याचे टाके यांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जखमी हनुमंत टाके यांची उपजिल्हा रुग्णालयात येऊन भेट घेत घटनेची माहिती घेतली आहे. या परिसरात तीन बिबटे समूहाने फिरत असून अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा व बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यांनी अनुभवला मृत्यूचा थरार शेतकरी हनुमंत नारायण टाके हे लघुशंकेसाठी पहाटे बाहेर आले असता शिकार झपाटण्याच्या पावित्र्यात असलेल्या बिबट्याने त्यांच्या मानेवरच झडप घातली. पण सावध असलेल्या हनुमंत टाके यांनी मोठ्या ताकदीने एकहात बिबट्याच्या तोंडात देत कडवा प्रतिकार केला. यात त्यांची पाळीव कुत्री गुड्डीने मोलाची साथ दिली. या कुत्रीने बिबट्याशी कडवी झुंज देऊन आपल्या धन्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.