Cyclone Shakti : देशावर ‘शक्ती’ चक्रीवादळाचं नवं संकट; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? वाचा….

Cyclone Shakti | Weather Update : मे महिन्याच्या सुरुवातीपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. उन्हाने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. आता अचानक सुरू झालेल्या पावसाने थोडाफार दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळेत जोरदार वारेही सुटत आहेत, तसेच मधेमधे ढगाळ वातावरण तयार होत होते.
अखेर कुठंतरी पावसाला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहेत. पावसाने वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. या पावसाने गरमीपासून नागरिकांची सुटका झाल्याचे चित्र आहे. या वर्षी मान्सून नेहमीपेक्षा लवकर, म्हणजेच 27 मेच्या सुमारास केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसामुळे तापमानात घट झाली असली, तरी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास साधारणत 6 जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यापूर्वी मे महिन्यात वादळी पाऊस आणि अवकाळी पावसाचा मारा होऊ शकतो.
याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे देशावर एक मोठं संकट घोंगावत आहे, भारतामध्ये आणखी एक चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात सायक्लॉन शक्तिची निर्मिती होऊ शकते असं हवामान विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाकडून बंगालाच्या उपसागरामध्ये ‘शक्ति चक्रिवादळ’ निर्माण होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाला आहे, या पार्श्वभूमीवर ही स्थिती महत्त्वाची असणार आहे. या भागत मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागानं आधीच जाहीर केलं आहे. एका रिपोर्टनुसार भारतीय हवामान विभागाकडून अंदमानच्या समुद्रात सायक्लोनिक सर्कुलेशनची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे 16 मे ते 22 मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. अजून या स्थितीतचं चक्रीवादळात रुपांतर झालेलं नाही, मात्र याचं रुपांतर चक्रीवादळात झाल्यास, पुन्हा एकदा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला ‘शक्ती’ नाव देण्यात येणार आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. महाराष्ट्रात 2025 च्या मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.
मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, जिथे पाऊस LPA च्या 110% पेक्षा जास्त असू शकतो. पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या 1252.1 मि.मी. पेक्षा समान किंवा जास्त असल्यास याचा चांगला फायदा होऊ शकतो.
नागरिकांसाठी सूचना :
पावसामुळे काही भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहनचालकांनी काळजी घ्यावी. घराच्या आसपास पाणी साचू नये, याची काळजी घ्यावी, कारण त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ शकते आणि गंभीर आजार होण्याची मोठी शक्यता असते.
अश्या वातावरणात नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे फार महत्वाचे ठरते. याच बरोबर शहरातील महानगरपालिकेने डास नियंत्रणासाठी फॉगिंग आणि कचरा व्यवस्थापनाची कामे सुरू केली आहेत. ज्यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर आणि रोगमुक्त राहील.





