Cyberattack : युरोपातल्या अनेक देशांमध्ये सायबर हल्ला; सुपर मार्केटमधील फ्रिझर पडले बंद !
स्वीडनमध्ये रात्रभरात फ्रिज यंत्रणा बंद पडण्याचे प्रमाण मर्यादित होते. तयार खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या अनेक दुकानांच्या शृखंलाधारकांनी याबाबतच ऑनलाइन पोस्ट करून माहिती दिली आहे.

Cyberattack – युरोपातल्या अनेक देशांमधील सुपरमार्केटमधील फ्रिजर आणि फ्रिज सोमवारी बंद पडले. त्यामुळे नाशवंत खाद्यपदार्थांची नासाडी झाली. एकाचवेळी स्वीडन, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि एस्टोनियामधील सुपरमार्केटमधील फ्रिजर आणि फ्रिज बंद होण्यामागे सायबर हल्ला हे कारण असल्याचे बोलले जाते आहे.
गेल्या महिन्यात देखील फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केट आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमधील रेफ्रिजरेशन प्रणालींना सायबर हल्लेखोरांनी रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केले होते. त्यामुळे फ्रिजरमधील तापमान अचानक वाढल्यामुळे खाद्यपदार्थांची नासाडी झाली होती.
स्वीडनमध्ये रात्रभरात फ्रिज यंत्रणा बंद पडण्याचे प्रमाण मर्यादित होते. तयार खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या अनेक दुकानांच्या शृखंलाधारकांनी याबाबतच ऑनलाइन पोस्ट करून माहिती दिली आहे. मात्र बेल्जियममध्ये हे प्रमाण जास्त होते. त्या तुलनेत शेजारच्या लक्सेंबर्गमध्ये काही प्रमाणात फ्रिज बंद पडले होते.
एस्टोनियामध्ये सायबर हल्लेखोरांनी रेफ्रिजरेशन नियंत्रित करणाऱ्या संगणकात प्रवेश करून तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत वाढवले होते, असे कंपनीने म्हटले आहे. पण कोणत्या दुकानात हा सायबर हल्ला झाला, हे कंपनीने स्पष्ट केले नाही. मात्र काही मिनिटातच ही प्रणाली पुन्हा व्यवस्थित करण्यात आल्याने मोठे नुकसान झाले नाही, असे स्पष्ट केले गेले.
जपानमध्ये ऑनलाइन सेवा प्रभावित
जपानमध्ये ऑनलाइन सेवा देणाऱ्या जीएमओ इंटरनेट ग्रुपलाही सायबर हल्ल्याचा फटका बसला. सायबर हल्ल्यामुळे सुरक्षा प्रभावित झाल्याबद्दल या कंपनीने ग्राहकांची माफी मागितली आहे. त्यांच्या ओनमेई डॉट कॉम या डेस्कटॉप क्लाउड नावाच्या क्लाउड सेवेमध्ये अनधिकृत प्रवेशामुळे माहिती लीक झाली आहे.
तसेच ग्राहकांना आठवत नसलेल्या व्यवहारांमुळे अनेक सिक्युरिटीज कंपन्या आणि इतर व्यवसायांवर परिणाम झाला. अशी २६ हजारांहून अधिक प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले.





