Nepal News : नेपाळमध्ये अडकलेल्या ६ भारतीय पर्यटकांची सुटका
शनिवारी दुपारपासून २ महिलांसह ६ भारतीय या राष्ट्रीय उद्यानात अडकले होते. खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने या सर्वांची सुटका करण्यात आली, असे डोल्पा जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nepal News – नेपाळमधील तुफान बर्फवृष्टीमुळे शेय-फोकसुंदो राष्ट्रीय उद्यानामध्ये अडकून पडलेल्या ६ भारतीय पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. शनिवारी दुपारपासून २ महिलांसह ६ भारतीय या राष्ट्रीय उद्यानात अडकले होते. खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने या सर्वांची सुटका करण्यात आली, असे डोल्पा जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अडकून पडलेले भारतीय पर्यटक राजधानी काठमांडूच्या वायव्येला ३०० किलोमीटर अंतरावरील शेय फोकसुंदो ग्रामीण महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ८ मधील धो भागात गेले होते. या भागात बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे ते अडकून पडले होते.
असे डोलपा मुख्य जिल्हा अधिकारी जुनू धकाल यांनी सांगितले. शेय पोकसुंदो तलाव समुद्रसपाटीपासून ३,६०० मीटर उंचीवर आणि अंदाजे १४५ मीटर खोल आहे. नेपाळमधील हा सर्वात खोल तलाव असल्याचे मानले जाते.
अडकून पडलेल्या पर्यटकांचे ठिकाण निश्चित झाल्यावर त्यांना सोडवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. मात्र खराब हवामानामुळे लष्कराचे हेलिकॉप्टर या भागात उतरू शकले नाही. हेलिकॉप्टरला न उतरता परत फिरावे लागले. त्यामुळे बचाव मोहिम सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली होती.
स्थानिक प्रशासन सिमरिक एअर या खासगी हेलिकॉप्टरची मदत घेतली आणि सर्व ६ पर्यटकांची सुटका केली. त्या सर्वांवर डोल्पा जिल्ह्यातील ड्यून येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे पोलिसांनी सांगितले.






