CSK vs PBKS : सीएसकेचा किल्ला ढासळला! २०९ धावा करूनही पंजाबने मारली बाजी; श्रेयसच्या संघाचा सलग दुसरा विजय
CSK vs PBKS : पंजाब किंग्स (PBKS) संघाने आपला विजयाचा धडाका कायम राखत चेन्नई सुपर किंग्स (CSK) वर ५ गडी राखून मात केली आहे.

CSK vs PBKS Punjab Kings beat Chennai Super Kings : आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सने आपला दबदबा निर्माण केला आहे. शुक्रवारी झालेल्या लढतीत पंजाब ने यजमान सीएसकेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात ५ विकेट्सनी धूळ चारली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने २०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पंजाबने १८.४ षटकांत ५ गडी गमावून विजय मिळवला. यासह यंदाच्या हंगामातील दुसरा विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले
म्हात्रे आणि सर्फराझची फटकेबाजी व्यर्थ –
या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात संजू सॅमसनच्या (७ धावा) रूपाने खराब झाली. मात्र, युवा फलंदाज आयुष म्हात्रे याने ४३ चेंडूत ७३ धावांची खेळी करत पंजाबच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्याला शिवम दुबे (नाबाद ४५) आणि सर्फराझ खान (१२ चेंडूत ३२ धावा) यांनी मोलाची साथ दिल्याने चेन्नईने ५ बाद २०९ धावांपर्यंत मजल मारली. सर्फराझने अवघ्या १२ चेंडूत ३२ धावा कुटत मैदानात तुफान फटकेबाजी केली, मात्र हे मोठे आव्हान पंजाबला रोखण्यासाठी पुरेसे ठरले नाही.
श्रेयस अय्यरची कर्णधारपदाला साजेशी खेळी –
Led the show with example 🫡#PBKS Captain Shreyas Iyer goes back for a well made 50(29) 👏👏
Updates ▶️ https://t.co/riWrE2EZiF#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvPBKS pic.twitter.com/kCpWu5LluE
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2026
प्रत्युत्तरात २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला प्रियांश आर्या (११ चेंडूत ३९ धावा) आणि प्रभसिमरण सिंह (४३ धावा) यांनी ६१ धावांची वादळी सलामी दिली. या पायावर कळस चढवण्याचे काम कर्णधार श्रेयस अय्यरने केले. अय्यरने २९ चेंडूत ५० धावांची संयमी आणि आक्रमक खेळी करत संघाचा विजय सुकर केला. पंजाबने १८.४ षटकातच ५ गडी गमावून हे लक्ष्य गाठले आणि हंगामातील सलग दुसरा विजय नोंदवला. चेन्नईकडून मॅट हेन्री आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, पण ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.
पंजाब गुणतालिकेत अव्वल तर, सीएसके तळात
पंजाब किंग्सने आयपीएल २०२६ हंगामातील आपला दुसरा विजय मिळवला. पहिल्या सामन्यात पंजाबने गुजरात टायटन्सवर मात केली होती. ज्यामुळे आता त्यांना नेट रनरेटमध्ये फायदा झाला आहे. दोन सामन्यांतील चार गुणांसह आणि ०.६३७ च्या नेट रन रेटने आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्सला या हंगामात सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे त्यांची गुणतालिकेत नाजूक स्थिती निर्माण झाली आहे आणि ते -२.५६२ च्या नेट रन रेटसह तळाशी आहेत.





