Akash Madhwal : ‘मुंबईच्या’ हिरोची चेन्नईत एन्ट्री! MI विरुद्धच्या सामन्यापूर्वी CSKचा मास्टर स्ट्रोक; आयुष म्हात्रेच्या जागी दिली संधी
Akash Madhwal : १८ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात युवा फलंदाज आयुष म्हात्रेला 'हॅमस्ट्रिंग'ची गंभीर दुखापत झाली होती

Akash Madhwal CSK Replacement IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) समोर दुखापतग्रस्त खेळाडूंचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. संघाचा युवा सलामीवीर आयुष म्हात्रे दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, चेन्नईने त्याच्या जागी मुंबई इंडियन्सच्या एका माजी ‘मॅचविनर’ खेळाडूला संघात स्थान दिले आहे. तो कोण आहे? जाणून घेऊया.
आयुष म्हात्रेच्या जागी कोणाला मिळाली संधी? (Akash Madhwal)
चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल २०२६ (IPL2026) चा प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. १८ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात युवा फलंदाज आयुष म्हात्रेला ‘हॅमस्ट्रिंग’ची गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे आयुष आता संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. अशा कठीण प्रसंगी चेन्नईने अनुभवी वेगवान गोलंदाज आकाश मधवाल याला ताफ्यात सामील करून आपली गोलंदाजी अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Player Replacement 🚨@ChennaiIPL sign Akash Madhwal as a replacement for the injured Ayush Mhatre.
More Details 🔽 | #TATAIPL | #KhelBindaas https://t.co/2NAEWMDYY0
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
मुंबई इंडियन्सचा जुना शिलेदार – (Akash Madhwal)
उत्तराखंडचा ३२ वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश मधवाल यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचा भाग राहिला आहे. २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करताना त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. विशेषतः लखनौ सुपर जाएंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने अवघ्या ५ धावांत ५ विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र, २०२६ च्या लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. आता चेन्नईने त्याला ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर आपल्या संघात स्थान दिले आहे.
आकाशची आतापर्यंतची कामगिरी –
आकाशने आयपीएलमध्ये आतापर्यंत १७ सामने खेळले असून २५.६५ च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट १०.०६ असला तरी, डेथ ओव्हर्समध्ये अचूक यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता चेन्नईसाठी फायदेशीर ठरू शकते. म्हात्रे फलंदाज असूनही त्याच्या जागी एका गोलंदाजाला संधी देऊन चेन्नईने आपल्या गोलंदाजीतील त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता धोनीच्या मार्गदर्शनाखाली आकाश पुन्हा एकदा तीच ‘पाच विकेट्स’ वाली जादू दाखवणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





