CSK Playoff Scenarios : सीएसके थेट नंबर ४ वर पोहोचणार? पॉइंट्स टेबलमधील ‘त्या’ अजब गणितामुळे राजस्थान-पंजाबची धडधड वाढली!
CSK Playoff Scenarios : चेन्नईसाठी केवळ सामना जिंकणे पुरेसे नाही; तर बाद फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना एका मोठ्या विजयाची आणि सोबतच इतर तीन संघांच्या पराभवाची प्रार्थना करावी लागणार आहे

CSK Playoff Scenarios IPL 2026 : आयपीएल २०२६ मधील बाद फेरीची (प्ले-ऑफ) शर्यत अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी हा संपूर्ण हंगाम चढ-उतारांचा आणि आव्हानात्मक राहिला असला, तरी संघाने अजूनही हिंमत हारलेली नाही. आज चेन्नईचा संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बलाढ्य गुजरात टायटन्सविरुद्ध लढाईसाठी मैदानात उतरणार आहे. मात्र, चेन्नईसाठी केवळ सामना जिंकणे पुरेसे नाही; तर बाद फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना एका मोठ्या विजयाची आणि सोबतच इतर तीन संघांच्या पराभवाची प्रार्थना करावी लागणार आहे.
अहमदाबादमध्ये आज ‘करा किंवा मरा’ मुकाबला! (CSK Playoff Scenarios)
गुजरात टायटन्सचा संघ आधीच प्ले-ऑफसाठी पात्र ठरला असून, टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी ते आज पूर्ण ताकदीने खेळतील. दुसरीकडे, चेन्नईसाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा आहे. चेन्नईने आतापर्यंत १३ सामन्यांपैकी ६ सामन्यांत विजय मिळवला असून ७ सामन्यांत पराभव पत्करला आहे. १२ गुणांसह चेन्नई सध्या शर्यतीत कायम आहे. आजचा सामना हरल्यास चेन्नईचे आव्हान थेट संपुष्टात येईल. मात्र, विजय मिळवल्यास चेन्नईचे १४ गुण होतील आणि संघ किमान पाचव्या स्थानावर पोहोचेल.
चौथ्या स्थानावर जाण्यासाठी ‘हे’ आहे चेन्नईच्या हातातील गणित (CSK Playoff Scenarios)
सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राजस्थान रॉयल्स (RR) विराजमान आहे. राजस्थानला खाली खेचण्यासाठी चेन्नईला गुजरातविरुद्ध केवळ विजय नाही, तर ‘मोठा विजय’ मिळवावा लागेल. चेन्नईने आज प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना गुजरात टायटन्सचा किमान २० धावांनी पराभव करावा लागेल. असे झाल्यास चेन्नईचा नेट रनरेट (NRR) राजस्थानपेक्षा सरस होईल आणि संघ तात्पुरता चौथ्या स्थानावर झेप घेईल.
विजयानंतरही ‘या’ ३ संघांच्या पराभवावर अवलंबून असेल नशीब! (CSK Playoff Scenarios)
🚨 CSK PLAYOFF SCENARIOS EXPLAINED 🚨
1️⃣ Beat GT by at least (approx 25) runs 💛
2️⃣ PBKS to lose against LSG 🛑
3️⃣ RR to lose against MI ❌
4️⃣ KKR to lose one of their games 📉 pic.twitter.com/N1WwrD1EHl— Cricket Central (@CricketCentrl) May 21, 2026
गुजरातला मोठ्या फरकाने हरवल्यानंतरही चेन्नईचे नशीब इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. चेन्नईला प्ले-ऑफचे तिकीट मिळवण्यासाठी पुढील तीन गोष्टी घडणे अनिवार्य आहे:
- पंजाब किंग्सचा (PBKS) संघ त्यांच्या पुढील सामन्यात लखनौ सुपर जायंट्सकडून (LSG) हरला पाहिजे.
- राजस्थान रॉयल्स (RR) त्यांचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाला पाहिजे.
- कोलकाता नाइट राइडर्सचा (KKR) संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हरला पाहिजे.
जर ही सर्व समीकरणे चेन्नईच्या बाजूने लागली, तरच संघ प्ले-ऑफमध्ये आपले स्थान पक्के करू शकेल; अन्यथा त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आज संपूर्ण देशाचे लक्ष अहमदाबादमधील या हायव्होल्टेज सामन्याकडे लागले आहे.





