Rahul Gandhi – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नियंत्रण आहे. त्याचे अनुकरण मोदी करू इच्छितात. मोदींना तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांवर नियंत्रण ठेवायचे आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोडले. विधानसभा निवडणुकीतील प्रचारासाठी राहुल यांनी शनिवारी तमिळनाडूत विविध सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने मोदींवर निशाणा साधला. ट्रम्प सांगतील तशी कृती मोदी करतील. तसेच मोदींना तमिळनाडूतील मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित आहे. त्यामुळे तमिळनाडूत अण्णाद्रमुकची सत्ता यावी असे मोदींना वाटते. अण्णाद्रमुक हा केवळ भाजपचा मुखवटा आहे. द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या जागी भाजपला मुख्यमंत्री म्हणून कळसुत्री बाहुला हवाय. त्या मुख्यमंत्र्याने केवळ मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार वागावे अशी भाजपची इच्छा आहे. त्या पक्षाला स्टॅलिन यांच्यावर कधीच नियंत्रण मिळवता येऊ शकणार नाही याची जाणीव आहे. मिळनाडूच्या मुल्यांशी स्टॅलिन कधीच तडजोड करणार नाहीत हेही तो पक्ष जाणून आहे, अशी शाब्दिक टोलेबाजी राहुल यांनी केली. तमिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता आहे. त्या आघाडीचा कॉंग्रेस पक्ष घटक आहे.