पुणे | श्री त्रिशुंड गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर गुरुपौर्णिमेनिमित्त दिवसभर खुले ठेवण्यात आले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त वर्षातून एकदाच तळघर खुले राहात असल्याने मंदिराच्या तळघरातील दलपतगिरी गोसावी यांच्या समाधीचे भाविकांनी रविवारी दर्शन घेतले
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली वेगळी असून, वेरूळच्या कोरीव लेणीसदृश मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. श्री त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे याची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे.
या मंदिरातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी २६ ऑगस्ट १७५४ मध्ये या मंदिराची निर्मिती केली.
तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी खुले करण्यात येते. गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस रविवारी सुटीच्या दिवशी आल्याने श्री त्रिशुंड गणपती व तळघरातील दलपतगिरी गोसावी यांच्या समाधी दर्शनासाठी सकाळपासूनच पुणे शहर आणि परिसरातील भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांची रांग कायम होती, अशी माहिती श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्टतर्फे देण्यात आली.
श्री त्रिशुंड गणपती मंदिर ट्रस्ट, श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्ट आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश भक्तांसाठी मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू/काचबिंदू व पडद्याच्या शस्त्रक्रिया याबाबत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन, पुणे आणि रेणुका नेत्रालय, पुणे यांचे या उपक्रमास सहकार्य लाभले.





