Ronaldo Georgina Wedding : अखेर गुपचूप उरकलं लग्न! ४१ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोने ११ ऑगस्टला ‘या’ सुंदरीशी बांधली लग्नगाठ
Ronaldo Georgina Wedding : प्रदीर्घ काळापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारे रोनाल्डो आणि त्याची पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्ज अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.

Cristiano Ronaldo Weds Georgina Rodriguez Secret Wedding Lisbon Cascais : फुटबॉल जगतातील महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या आयुष्यात आता एका नव्या आणि खास अध्यायाची सुरुवात झाली आहे. प्रदीर्घ काळापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारे रोनाल्डो आणि त्याची पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्ज (Georgina Rodriguez) अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर आपल्या लग्नाची बातमी शेअर करत या जोडीने जगभरातील चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला. ४१ वर्षीय रोनाल्डो आणि ३२ वर्षीय जॉर्जिनाने ११ ऑगस्ट रोजी इन्स्टावर हातातील लग्नाच्या अंगठ्यांचा फोटो शेअर करत “C G” असे अत्यंत छोटे पण खास कॅप्शन दिले.
कौटुंबिक वातावरणात पार पडला विवाह सोहळा –
मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाह सोहळा पोर्तुगालमधील लिस्बनजवळ असलेल्या ‘कास्काइस’ (Cascais) या अत्यंत निसर्गरम्य किनारपट्टीवरील रिसॉर्टमध्ये पार पडला. रोनाल्डोची जनसंपर्क यंत्रणा सांभाळणाऱ्या ‘ब्रंसविक ग्रुप’ने दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा अत्यंत खाजगी आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला. या विवाह सोहळ्याला रोनाल्डो आणि जॉर्जिनाची पाचही मुले उपस्थित होती. विशेष म्हणजे, ऑगस्ट २०२५ मध्ये जॉर्जिनाने त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली होती आणि ठीक एका वर्षानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. रोनाल्डो फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना दिसला होता.
२०१६ मध्ये सुरु झाली होती प्रेम कहाणी –
View this post on Instagram
या दोघांची प्रेम कहाणी २०१६ मध्ये माद्रिद येथे सुरू झाली होती, जेव्हा जॉर्जिना ‘गुच्ची’च्या एका स्टोअरमध्ये काम करत होती. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये झुरिच येथील ‘बेस्ट फिफा फुटबॉल अवॉर्ड्स’दरम्यान हे जोडपे पहिल्यांदाच जाहीरपणे एकत्र दिसले. हळूहळू या प्रेमाचे रूपांतर जगातील सर्वात चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी कपल्समध्ये झाले. नेटफ्लिक्सवरील ‘आय एम जॉर्जिना’ (I Am Georgina) या वेब सीरिजमध्येही त्यांच्या या प्रेमप्रकरणाचे आणि कौटुंबिक आयुष्याचे सुंदर पैलू जगभरातील प्रेक्षकांनी पाहिले आहेत.
या सीरिजमध्ये बोलताना रोनाल्डोने कबूल केले होते की, सुरुवातीला हे नाते इतके घट्ट होईल असा अंदाज त्याला नव्हता; परंतु काळाच्या ओघात जॉर्जिना त्याच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती बनली. रोनाल्डो आणि जॉर्जिनाला अलाना आणि बेला या दोन मुली आहेत. याशिवाय जॉर्जिना रोनाल्डोचा मोठा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनिअर आणि जुळी मुले ईवा मारिया व माटेओ यांचाही स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळ करत आहे. या लग्नामुळे गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.





