Cristiano Ronaldo Retirement : सलग ६ वर्ल्ड कप खेळणाऱ्या फुटबॉलच्या सम्राटाची निवृत्ती! पोस्ट शेअर करत २३ वर्षांच्या कारकिर्दीला दिला पूर्णविराम
Cristiano Ronaldo Retirement : फुटबॉलचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. २३ वर्षांच्या कारकिर्दीनंतर, त्याने पुन्हा कधीही पोर्तुगाल संघाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Cristiano Ronaldo Announces Retirement From International Football : पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू आणि पाच वेळा बॅलन डी’ओर विजेता ख्रिस्तियानो रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा करून क्रीडा जगताला मोठा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत त्याने हा निर्णय जाहीर केला. प्रदीर्घ विचारमंथनानंतर पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्द थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले. नोव्हेंबरमधील आंतरराष्ट्रीय ब्रेकनंतर रोनाल्डो आपली ऐतिहासिक नंबर-७ जर्सी संघाकडे परत सोपवणार असून, तो पुन्हा कधीही पोर्तुगालच्या लाल-हिरव्या जर्सीत खेळताना दिसणार नाही.
२३ वर्षांची कारकीर्द आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर १४६ गोल –
रोनाल्डोने २० ऑगस्ट २००३ रोजी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी कझाकस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते. गेल्या २३ वर्षांच्या देदीप्यमान प्रवासात त्याने देशासाठी २३४ सामन्यांत विक्रमी १४६ गोल डागले, तर ४६ असिस्टही नोंदवले. आंतरराष्ट्रीय आणि क्लब स्तरावर मिळून रोनाल्डोच्या नावावर आतापर्यंत ९८५ गोल जमा आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केल्यानंतर आता क्लब फुटबॉल खेळत राहून कारकिर्दीतील ऐतिहासिक १००० गोलांचा जादुई टप्पा गाठण्यावर त्याचे संपूर्ण लक्ष असणार आहे.
सलग ६ फिफा विश्वचषक खेळणारा जगातील एकमेव खेळाडू –
Portugal estará sempre em mim https://t.co/dnFj51rxmh
— Cristiano Ronaldo (@Cristiano) November 5, 2026
रोनाल्डोने २००६ मध्ये जर्मनीमध्ये आपल्या पहिल्या फिफा विश्वचषकात भाग घेतला होता. त्यानंतर २०१०, २०१४, २०१८, २०२२ आणि २०२६ अशा सलग ६ विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळण्याचा अभूतपूर्व विक्रम त्याने प्रस्थापित केला. इतकेच नव्हे, तर सलग ६ वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल नोंदवणारा तो जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे. विश्वचषकातील २७ सामन्यांमध्ये त्याने एकूण ११ गोल केले, ज्यामध्ये २०२६ च्या विश्वचषकात उझबेकिस्तानविरुद्ध केलेल्या विक्रमी गोलांचाही समावेश आहे.
२००६ मध्ये उपांत्य फेरी; विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अधुरे
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक क्लब आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे पटकावणाऱ्या रोनाल्डोला फिफा विश्वचषक उचलण्याचे स्वप्न मात्र पूर्ण करता आले नाही. विश्वचषकातील पोर्तुगालची सर्वोत्तम कामगिरी २००६ मध्ये राहिली, जेव्हा संघाने उपांत्य फेरी गाठून चौथे स्थान मिळवले होते. रोनाल्डोच्या या तडकाफडकी निवृत्तीच्या निर्णयामुळे जगभरातील कोट्यवधी फुटबॉलप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत असून, एका सुवर्ण युगाचा अखेर झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.





