Pune Crime : गणेशोत्सवातील दोन गंभीर गुन्ह्यांची उकल; तीन गुन्ह्यांतील पाहिजे आरोपीही जेरबंद
Pune Crime : गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई; जुगार प्रकरणातील आरोपीलाही पकडले

Pune Crime : पुणे शहर पोलिसांनी फरारी आणि पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत गुन्हे शाखेच्या युनिट-२ने गणेशोत्सवादरम्यान घडलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांची उकल केली. या कारवाईत स्वारगेट, बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्यांतील चार गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन करण्यात आले. यामध्ये एका विधिसंघर्षित बालकाचाही समावेश आहे.
गुन्हे शाखा युनिट-२चे अधिकारी आणि अंमलदार २१ ऑक्टोबर रोजी हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, शंकर कुंभार, आशिष यादव, महेश मंडलिक, योगेश मांढरे आणि संतोष टकले यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.
गणेशोत्सवादरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांचा तपास करून धीरज निलेश कदम (वय १९, रा. जनता वसाहत, पुणे) आणि एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. या दोघांना स्वारगेट पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत.
याशिवाय, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाणीसह अन्य कलमांतील गुन्ह्यात पाहिजे असलेला आकाश दादा सोनवणे (वय ३०, रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड, पुणे) याला ताब्यात घेऊन बिबवेवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जुगार प्रतिबंधक कायद्यातील गुन्ह्यात पाहिजे असलेला रमेश धनसिंग दास ऊर्फ बिल्डर (वय ३८, रा. मार्केट यार्ड, पुणे) यालाही ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोहार, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर नेवसे यांनी सहभाग घेतला.
तसेच पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, महेश मंडलिक, शंकर कुंभार, योगेश मांढरे, संतोष टकले, ओमकार कुंभार, विजय पवार, सर्जेराव सरगर, गणेश थोरात, नागनाथ राख, विनायक वगारे आणि आशिष यादव यांनी कामगिरी केली. महिला पोलीस अंमलदार साधना ताम्हणे आणि विद्या शिंदे यांनीही या कारवाईत सहभाग घेतला.





