Prisoner Escaped : जन्मठेप भोगणारा कैदी फरार! येरवडा कारागृहात आठवड्यातील दुसरी घटना
Prisoner Escaped : खडक पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेचा कैदी जनार्दन अडसुळे येरवड्यातून फरार; कारागृह प्रशासनाने दिली पोलिसांत तक्रार.

Prisoner Escaped – येरवडा येथील खुल्या कारागृहातून आणखी एका कैद्याने पळ काढला आहे. हा कैदी खुनाच्या गुन्ह्यात जन्म ठेपेची शिक्षा भोगत होता. जनार्दन शंकर अडसुळे (रा. काशेवाडी भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, ८ मे रोजी याच खुल्या कारागृहातून एका कैद्याने पळ काढला आहे. याप्रकरणी येरवडा कारागृह प्रशासनाच्या वतीने चंद्रकांत सयाजी खांदवे (५८) यांनी येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी कैदी जनार्दन अडसुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ मे रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैदी जनार्दन अडसुळे याच्यावर खडक पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याला न्यायालयाने या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मात्र, त्याच्या कारागृहातील चांगल्या वर्तनामुळे त्याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तो तेथे शेतीतील कामे करत होता. मात्र, १२ मे रोजी त्याने त्याला झालेली उर्वरीत झालेली शिक्षा चुकविण्याच्या हेतूने कायदेशीर रखवालीतून पळ काढला. रात्री उशिरापर्यंत अडसूळे सापडला नाही. त्यानंतर कारागृह प्रशासनाने येरवडा पोलिसांत तक्रार दिली.
येथून ८ मे रोजी संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) या जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याने पळ काढला होता. त्याला नुकतेच गुन्हे शाखेने अटक केली आहे. आता पुन्हा दुसऱ्या कैद्याने पळ काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




