Yerwada Prisoner Escaped : येरवडा कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार! ‘जेवण आणतो’ असे सांगून जवानांच्या डोळ्यादेखत झाला पसार
Yerwada Prisoner Escaped : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील शेती विभागात बिनसिमकार्डचा मोबाईल सापडल्याने खळबळ; चौकशीदरम्यान जन्मठेपेचा कैदी संतोष भिंगारे फरार.

Yerwada Prisoner Escaped – येरवडा मध्यवर्ती कारागृहा अंतर्गत खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला शिक्षाबंदी कैदी फरार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मोबाइल फोन सापडल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान संबंधित कैद्याने जेवण घेऊन येतो, असे सांगत कार्यालयातून बाहेर पडून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी तुरुंगाधिकारी नागनाथ महादेव भानवसे (५५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
ते येरवडा मध्यवर्ती कारागृहात सर्कल इंचार्ज म्हणून कार्यरत आहेत. कारागृह प्रशासनाकडून शेती विभागातील तुती बाग परिसरात शुक्रवारी (दि. ८) दुपारी सुरक्षा पाहणी सुरू होती. त्यावेळी शेतीमध्ये बेवारस अवस्थेत मोबाइल फोन बॅटरीसह आढळून आला. मोबाइलमध्ये सिमकार्ड नव्हते. या प्रकाराची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक यांना देण्यात आली. त्यानंतर संबंधित घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
या चौकशीदरम्यान संशयाच्या आधारे शिक्षाबंदी संतोष लक्ष्मण भिंगारे आणि शिवाजी प्रभाकर केदार यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशी सुरू असताना संतोष भिंगारे याने सायंकाळचे जेवण घेऊन येतो, असे सांगून बराकीकडे गेला. मात्र, त्यानंतर तो परतलाच नाही. कारागृह प्रशासनाने बराक, परिसर, शेती विभाग आणि जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. तसेच, रेल्वे स्टेशन, स्वारगेट आणि शिवाजीनगर एसटी स्थानकांवरही कर्मचारी पाठवण्यात आले.
तरीही संबंधित कैदी आढळून आला नाही. फरार झालेला संतोष लक्ष्मण भिंगारे हा सातारा येथील भुईंज पोलीस ठाण्यातील खून प्रकरणात दोषी ठरला असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तो १९ऑक्टोबर २०२५ मध्ये कोल्हापूर खुल्या जिल्हा कारागृहातून येरवडा खुल्या कारागृहात वर्ग करण्यात आला होता. कारागृहातील केशकर्तनालयात त्याची नियुक्ती करण्यात आली होती.




