Crime News: आळंदी रेल्वे स्थानकावर थरार! कपडे काढून तरुणाचा तुफान धिंगाणा; थेट पोलिसांवर दगडफेक
Crime News: आळंदी म्हातोबाची रेल्वे स्थानकावर १९ वर्षीय तरुणाची प्रवाशांवर दगडफेक; आवरण्यासाठी गेलेल्या पोलीसांच्या डोळ्याला गंभीर फ्रॅक्चर.

Crime News – आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील रेल्वे स्थानकावर एका 19 वर्षीय तरुणाने मध्यरात्री अचानक धिंगाणा घालत प्रवाशांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली. अंगावरील कपडे व भ्रमणध्वनी फेकून देत हातात दगड घेऊन प्रवाशांना लक्ष्य करणार्या तरुणाला आवरण्यास गेलेल्या पोलिसांवरही त्याने दगडफेक केली.
या हल्ल्यात पोलीस हवालदार प्रदीप गाडे यांच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तरुणाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पंकज अजमेर कुमार (वय 19, रा. लिखणी मझीयाखर, जि. दिंडोरी, मध्य प्रदेश) असे दगडफेक करणार्या तरुणाचे नाव आहे. तर जखमी पोलीस हवालदाराचे नाव प्रदीप गाडे आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार दीपक अर्जुन गायकवाड यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अंमलदार दीपक गायकवाड व पोलीस हवालदार प्रदीप गाडे हे थेऊर बीट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. रात्री सुमारे 11.44 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या उपकरणावर आळंदी रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने रेल्वेतून उतरून प्रवाशांवर दगडफेक सुरू केल्याची माहिती मिळाली.
संबंधित तरुणाने अंगावरील कपडे काढून फेकल्याचेही सांगण्यात आले. माहिती मिळताच गायकवाड व गाडे तातडीने आळंदी म्हातोबाची रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले. मध्यरात्री सुमारे 12.15 वाजता ते घटनास्थळी पोहोचले असता एक तरुण अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत रेल्वे स्थानक परिसरात पडलेले दगड उचलून प्रवाशांच्या दिशेने फेकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तरुणाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक सुरू केली. त्याने फेकलेला दगड पोलीस हवालदार प्रदीप गाडे यांच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला जोरात लागला. त्यात गाडे गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या चेहर्यावरून रक्तस्राव सुरू झाला.
संतप्त प्रवाशांनी तरुणाला पकडले
तरुणाच्या दगडफेकीमुळे संतप्त झालेल्या काही प्रवाशांनी त्याला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रवाशांना बाजूला केले आणि तरुणाला रेल्वे स्थानकातील कार्यालयात नेले. दरम्यान, तरुणाने अंगावरील कपडे आणि भ्रमणध्वनीही फेकून दिला होता. एका प्रवाशाने ते साहित्य पोलिसांकडे आणून दिल्यानंतर कपड्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आधारकार्ड आढळून आले. त्यावरून तरुणाची ओळख पंकज अजमेर कुमार अशी पटली.






