Crime News : कोयता-चाकूचा धाक दाखवून लूट; आरोपींना नेवासे पोलिसांनी तासाभरात केले जेरबंद
Crime News : सदरील गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तात्काळ आरोपीचा तपास सुरू केला.

नेवासे : कोयता आणि चाकूचा धाक दाखवून टाटा एस चालकाला लुटणाऱ्या दोन आरोपींना नेवासे पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करत आरोपींकडून रोख रक्कम, बुलेट आणि मोबाईल असा एकूण १ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे.
नेवासे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१२ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील इमरान रसूल खान हे टाटा एस गाडीने प्रवासी घेऊन अहिल्यानगरहून संभाजीनगरकडे जात असताना खडका शिवारातील हॉटेल औदुंबर जवळ मूकिंदपूर येथील अभिषेक जालिंदर पिटेकर आणि भरत बापूसाहेब भागवत या दोघांनी बुलेट गाडी आडवी लावून टाटा एस गाडी थांबवत कोयता व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील २५०० रुपये जबरदस्तीने काढून घेत पळून गेले.
या प्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात गु.र.नं.६७९/२०२६ या प्रमाणे नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तात्काळ आरोपीचा तपास सुरू केला. फिर्यादीच्या वर्णनावरून आरोपींना मूकिंदपूर येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून लुटलेली २५०० रुपयांची रोख,गुन्ह्यात वापरलेली अंदाजे १.५० लाखांची बुलेट आणि ३० हजारांचे दोन मोबाईल असा एकूण १,८२,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत नेवासे पोलिसांकडून अशा प्रकारे कोणाला लुटले असेल तर नेवासा पोलीस ठाणे येथे तातडीने संपर्क साधावा अन्यथा 02427-241233 किंवा 112 वर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.





