गुन्हेगारीचे केंद्र नागपूरऐवजी पुणे ; सुप्रिया सुळे यांचा आरोप

राज्याची गंभीर परिस्थिती
जळोची – अगोदर गुन्ह्यांचे केंद्र महाराष्ट्रात नागपूर होते. दुर्दैवाने आता ते पुणे बनत चालले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत भयानक आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. बारामती येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
पुण्यातील महिला पोलिसावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात सुळे म्हणाल्या की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पुण्यात सातत्याने क्राईम वाढत आहे. मी आरोप करीत नाही, हा डेटा केंद्र सरकारचा आहे. हा डेटा महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे, असे सांगतोय. यापूर्वी नागपूर केंद्र असायचं. आता पुणे आहे.
रवींद्र वायकर यांना नुकतीच त्यांच्यावरील आरोपासंदर्भात क्लीनचीट मिळाली आहे. या संदर्भात विचारले असता सुळे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाचे नेते अगोदर विरोधातील लोकांवर आरोप करतात, त्यानंतर त्यांचा भाजपा किंवा मित्र पक्षात प्रवेश घेतात. नंतर मंत्री, आमदार किंवा खासदार पदावर बसतात. भारतीय जनता पार्टी ही आता भ्रष्टाचारांची टोळी बनली आहे.
सुळे म्हणाल्या की, वायकर यांच्यावरील आरोप आणि ते भ्रष्टाचारी आहेत की, नाही याचे उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. जे महाराष्ट्रातले आमदार, खासदार जे आज तुमच्याबरोबर आहेत. ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केले. ते सिद्ध झाले नाहीत. यातील खरं काय खोटं काय याची एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्याने मागितली पाहिजे की, नक्की भ्रष्टाचार कोण या राज्यात करीत आहे.
जिल्हा नियोजन समितीचा निधी द्या
सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना जिल्हा नियोजन मंडळाच्या निधी बाबत पत्र दिले आहे. या संदर्भात विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी पत्र लिहिलं आहे. याचे कारण की, अमोल कोल्हे आणि मला निधी मिळत नाही. जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागत आहोत. आम्ही निवडून आलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहोत. पाच टक्क्यांचा तर आमचा अधिकार आहे ना ? आम्ही आमच्या कामासाठी निधी मागत नाही. लोकांचा विकास हवा आहे. आम्हाला क्रेडीट नको. आमचं काम आहे. लोकांच्या सेवेसाठी आम्ही निधी मागत आहोत.





